मुंबई – केंद्र सरकारविरोधात समाजमाध्यमांवर लिहिणार्या कलाकारांचीही चौकशी करणार का ? अशी विचारणा भाजपचे आमदार राम कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे.
राज्य सरकारने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकारांच्या ट्वीटच्या चौकशीचा आदेश दिला आहे. ‘राम कदम यांनी या पत्राद्वारे हे आदेश त्वरित परत घ्यावेत’, अशी विनंती देशमुख यांना केली आहे. या पत्रात केंद्र सरकारविरोधात समाजमाध्यमांवर लिहिणार्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या ट्वीटला ‘काँग्रेसी ट्वीट’ म्हटले आहे.
‘सोनम कपूर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, अली फजल यांसह अनेक कलाकारांच्या ट्वीटमध्येही अनेक शब्द आणि ‘हॅशटॅग’ एकसारखेच आहेत. तुम्ही या कलाकारांच्या ट्वीटचीही चौकशी करणार का ?’, असा प्रश्न कदम यांनी विचारला आहे. ‘काँग्रेसच्या भाषेमध्ये परदेशी षड्यंत्रकारीचे समर्थन ट्वीट करणार्या ‘सेलिब्रिटीं’ची चौकशी कधी करणार ?
९१ वर्षांच्या भारतरत्न लतादीदी यांनी देशाला मोठे नाव मिळवून दिले. त्यांची चौकशी करून महाराष्ट्र सरकार त्यांचा अपमान करत आहे. आपण चौकशीचे हे आदेश त्वरित परत घ्यावेत’, अशी विनंती राम कदम यांनी केली आहे.