मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी
मुंबई – बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीत कर्तव्याचा भाग म्हणून सहभागी झाल्याचा पुरावा काय ? या बैठकीत कुणी सहभागी व्हायला सांगितले होते ? बैठकीनंतर नेमके काय केले ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या सुनावणीच्या वेळी मुख्य आरोपी ले. कर्नल पुरोहित यांच्याकडे केली. न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.
मालेगाव येथे बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला सैन्याच्या आदेशावरून गुप्तवार्ता मिळवण्यासाठी उपस्थित असल्याची स्वत:ची बाजू कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात मांडली आहे. यावर न्यायालयाने वरील प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी कर्नल पुरोहित यांनी ‘स्वत:वर झालेल्या कारवाईविषयी अन्वेषण यंत्रणांनी सैनिकांची अनुमती घेतली नसल्यामुळे आपणाला दोषमुक्तत करावे’, अशी न्यायालयाकडे मागणी केली आहे. यावर न्यायालयाने ही मागणी विशेष न्यायालयाकडे करण्याविषयी पुरोहित यांना सूचित केले. ही सुनावणी न्यायालयाने २४ फेबु्रवारीपर्यंत स्थगित केली आहे.