आतापर्यंत राज्यातील ५ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया चालू आहे. ६५२ केंद्रांवर ही लस दिली जात आहे. आतापर्यंत राज्यातील ५ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘तिसर्‍या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. त्यासाठी १ मार्चपासून नोंदणी करण्याची शक्यता आहे. केंद्रशासनाच्या सूचनेप्रमाणे राज्यात लसीकरण चालू आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात नियमित साधारणपणे ४० ते ४५ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत ‘कोविन पोर्टल’वर १० लाख ५४ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी झाली आहे. त्यांपैकी ४ लाख ६८ सहस्र २९३ आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले आहे. ५ लाख ४७ सहस्र प्राधान्याने लस देण्याच्या कर्मचार्‍यांची नोंदणी झाली आहे. यापैंकी ४१ सहस्र ४५३ जणांना लस देण्यात आली आहे. राज्यातील लसीकरणामध्ये कुठेही गंभीर दुष्परिणामांच्या घटनांची नोंद झालेली नाही. लसीकरण चालू असले, तरी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.’’