श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा सामाजिक संस्था कोणीही कर चुकवला तरी चूकच नव्हे का ?
मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पारधी समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या गुरुकुलम् आणि त्याचा परिसर यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १ कोटी ८६ लाख रुपये कर थकवल्याची नोटीस पाठवण्यात आली होती. याविषयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी तातडीने बैठक घेतली. या बैठकीनंतर करवसुलीच्या नोटिसीला स्थगिती देण्यात आली आहे. बैठकीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणी डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी संस्थेला न्यूनतम मुख्य कर आकारण्याची सूचना करून यावर तात्काळ तोडगा काढण्यास सांगितले. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘करआकारणीची पडताळणी करण्यात येईल, तसेच कर भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल’, असे बैठकीत सांगितले.
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘‘दोन्ही शाळांचा ३ ते साडेतीन कोटी रुपये कर होता. देणगी गोळा करून हा कर भरावा लागेल. न्यून केलेला कर पुढील मासात भरू.’’