सातारा येथे शिवसेनेचे इंधन दरवाढीच्या विरोधात ढकल स्टार्ट आंदोलन

सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत इंधन दरवाढीविरोधात शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असे ढकल स्टार्ट आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी हाताने बंद गाडी ओढत आंदोलन केले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे भावना व्यक्त करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले की, मोदी सरकारने इंधनांचे दर वाढवून मतदार राजाची घोर निराशा केली आहे. निवडणुका जवळ आल्या की, त्यांना दिवास्वप्ने दाखवायची मोदी यांची पद्धत आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून नागरिकांकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांऐवजी बैलगाडी अन् सायकल उपयोगात आणण्याचे पर्याय शिल्लक राहिले आहेत.