कोरोनाच्या रुग्णावर उपचाराचे निर्बंध शिथिल करण्यासाठी खासगी रुग्णालयांची याचिका

मुंबई – कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाची साथ आटोक्यात येत असतांनाही सरकारने उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना ८० टक्के खाटा राखीव ठेवणे आणि निश्‍चित केलेल्या दरांनी उपचार देण्याचे बंधन २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम ठेवले आहे. यामुळे खासगी रुग्णालयांची हानी होत आहे.

सरकारची बाजू मांडतांना राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईसह सात जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयांत पुरेशा खाटा उपलब्ध असल्या, तरी आयसीयू आणि व्हेंटिलेटरसह आयसीयू पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे तेथे किमान ५० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे बंधन ठेवावे लागेल. उर्वरित जिल्ह्यांत अधिसूचनेची कार्यवाही केली जाणार नाही; मात्र भविष्याची तरतूद विचारात घेता अधिसूचना रहित केली जाणार नाही, अशी भूमिका सरकारच्या वतीने मांडण्यात आली. याविषयी पुन्हा सुनावणी होणार आहे.