बाजारातील ५० टक्के खाद्यतेल भेसळयुक्त !

निष्क्रीय अन्न आणि औषध प्रशासन विभाग !

मुंबई – खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार व्यापक स्वरूपात ३० अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असलेल्या या पथकाने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणी तेल विक्री करणार्‍या आस्थापनांवर धाडी टाकल्या. यात अनुमाने ४ कोटी ९८ लाख ७४ सहस्र ९७३ रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक खाद्यतेलाचे नमुने अप्रमाणित अर्थात भेसळयुक्त आहेत, अशी माहिती सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी दिली. (गेल्या अनेक वर्षांपासून खाद्यतेलात भेसळ केली जाते. अन्न आणि औषध प्रशासनाकडून केवळ सणांच्या वेळी दुकानांतील खाद्यतेलांची पडताळणी करून दोषींवर वरवरची कारवाई केली जाते. वेळोवेळी खाद्यतेलाची पडताळणी न केल्यामुळे लोकांना भेसळयुक्त खाद्यतेल खावे लागल्याने त्यांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘याला अन्न आणि औषध प्रशासन उत्तरदायी आहे’, असे म्हटल्यास त्यात चूक काय ? – संपादक)

खाद्यतेलाचे ९३ पैकी ४९ नमुने अप्रमाणित !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जप्त केलेल्या खाद्यतेलाचे एकूण ९३ नमुने पडताळणीसाठी पाठवले होते. यातील मुंबई आणि ठाणे परिसरात विकले जाणारे ५० टक्क्यांहून अधिक खाद्यतेल हे भेसळयुक्त आणि अप्रमाणित आहे. अगदी शेंगदाणा तेलापासून ते तिळाच्या तेलापर्यंत सर्व प्रकारच्या खाद्यतेलात भेसळ होत आहे. आता नियमानुसार संबंधितांच्या विरोधात पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने राज्यात खाद्यतेलाची नियमित पडताळणी करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये ‘ब्रॅण्डेड’ खाद्यतेलाचीही पडताळणी केली जाणार आहे. (इतकी वर्षे खाद्यतेलात भेसळ होत असतांना अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी झोपले होते का ? त्यांनी राज्यभर कायमस्वरूपी खाद्यतेलाची नियमित पडताळणी करून भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई का केली नाही ? – संपादक)