देहलीतील आजच्या ट्रॅक्टर मोर्च्यात गोंधळ घालण्यासाठी ३०८ पाकिस्तानी ट्विटर खाती कार्यरत ! – देहली पोलिसांचा दावा

नवी देहली – प्रजासत्ताकदिनी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यावर नियंत्रण ठेवून गोंधळ घालण्यासाठी पाकमधील ३०८ ट्विटर खाती कार्यरत असल्याची माहिती देहली पोलिसांना मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे संचालन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

देहलीचे विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, लोकांची दिशाभूल करत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत पाकमध्ये अनुमाने ३०० ट्विटर खाती बनवण्यात आली आहेत. यावरून शेतकरी आंदोलनाविषयी सतत हॅशटॅगचा वापर केला जात आहे.  पाकपुरस्कृत आतंकवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करू शकतात, असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.