पाकिस्तानची महिला असल्याच्या संशयावरून महिलेला कळंगुट येथे घेतले कह्यात

महिलेचा वर्षभर गोव्यात विविध ठिकाणी वास्तव्य असल्याचा पोलिसांना संशय

पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – गोवा पोलिसांनी पाकिस्तानची नागरिक असल्याच्या संशयावरून २७ वर्षीय एका महिलेला कळंगुट येथे कह्यात घेतले आहे. संबंधित महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेकडे प्रवास अनुमती आदी कोणतीही कागदपत्रे नाहीत. महिलेने नेपाळमार्गे भारतात प्रवेश केल्याचे प्राथमिक अन्वेषणातून समोर आले आहे. संबंधित महिला एका भारतीय पुरुषासमवेत एका खोलीत भाडेपट्टीवर रहात होती. हे जोडपे गोव्यात किमान वर्षभर विविध ठिकाणी वास्तव्यास होते. या महिलेने हॉटेल आणि रेस्टॉरंट आदी ठिकाणी ‘रिसेप्शनिस्ट’, झाडू मारणे आदी कामे केली आहेत. पोलीस दलासह अन्य अन्वेषण यंत्रणांकडून महिलेचे अन्वेषण केले जात आहे. याविषयी गुप्चतर यंत्रणेकडून येणार असलेला अहवाल आणि अन्वेषण यंत्रणांचा अहवाल यांच्या आधारे पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. संबंधित महिला पाकिस्तानी असल्याची निश्‍चिती झाल्यानंतर महिलेला म्हापसा येथील ‘डिटेशंन सेंटर’मध्ये ठेवण्यात येणार आहे.