कोल्हापूर – येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती सुस्थितीत असून मूर्तीची कोणतीही झीज झालेली नाही. तथापि श्री महाकाली आणि श्री महासरस्वती देवींच्या मूर्तींची झीज झाल्याने संरक्षणाकरिता दोन्ही मूर्तींची रासायनिक जतन प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे मत पुरातत्व विभागातील तज्ञांनी १८ जानेवारी या दिवशी व्यक्त केले आहे.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात १८ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्यांनी पहाणी केली. पुरातत्व रसायन तज्ञ उपअधीक्षक श्री. श्रीकांत मिश्रा, श्री. सुधीर वाघ, पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक श्री. विलास वाहने, उपअधीक्षक श्री. उत्तम कांबळे यांनी मूर्तींची पहाणी केली. या वेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव, सचिव श्री. विजय पवार, वास्तूविशारद श्री. अमरजा निंबाळकर, ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा, श्री. गणेश नेर्लेकर, अधिवक्ता प्रसन्न मालेकर उपस्थित होते.
संपूर्ण मंदिरामध्ये काही प्रमाणात कार्बनचा थर दिसत आहे. तो काढून मंदिर स्वच्छ करून घेण्याची आवश्यकता असल्याचे विलास वाहने यांनी सूचित केले. मंदिराच्या छतावरील कोब्याच्या थराची पहाणी केल्यानंतर हे काम जोखमीचे आहे. सखोल अभ्यास करून आवश्यक पडताळणी करून याविषयी निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.