ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र चुरशीने मतदान
सांगली, १५ जानेवारी (वार्ता.) – राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ सहस्र २३४ निवडणुकींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत किरकोळ अपप्रकार वगळता चुरशीने मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झालेल्या कोरोनाच्या कार्यकाळात झालेली ही पहिलीच निवडणूक असली, तरी सर्वत्र मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. अगदी वयोवृद्धांनीही उत्साहाने मतदान केले. १८ जानेवारी या दिवशी मतमोजणी होणार आहे.
काही घडामोडी
१. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राजापूर ही केवळ ७ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत स्थापनेनंतर इथे पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. यातील १ क्रमांकाच्या प्रभागातील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील ४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ११ पर्यंत ९५ टक्के मतदान पूर्ण झाले होते.
२. पुणे – दौंड तालुक्यातील कुसेगाव या ठिकाणी सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर दोन गटांतील हमरी-तुमरीचे रूपांतर भांडणात झाले. या वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन गटांतील बाचाबाची थांबली. नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता.
३. सांगली जिल्ह्यात १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान !
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. यांपैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. १४३ ग्रामपंचायतींमधील ५५१ प्रभागांमधील १ सहस्र ५०८ जागांसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात दुपारी ३.३० पर्यंत ६८ टक्के मतदान झाले होते.
४. कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. जिल्ह्यात १२ तालुक्यांत दुपारी ३.३० पर्यंत ७३.२२ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ८० टक्के मतदान झाले.
५. सोलापूर जिल्ह्यात ५९० ग्रामपंचायतींसाठी गावागावांत चुरशीने मतदान
सोलापूर – जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील २ सहस्र ३२५ मतदान केंद्रांत मतदान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सांगोला तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत सर्वाधिक ५४.७३ टक्के, तर मोहोळ तालुक्यात सर्वांत अल्प ४०.६९ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या २ घंट्यात १२.५४ टक्के मतदान झाले होते; मात्र पुढील काही घंट्यांत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती.
तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून दगडफेकमतदान करण्याच्या किरकोळ कारणावरून तळेहिप्परगा (तालुका उत्तर सोलापूर) येथील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी आले होते. |