पाकने विमानाचे भाडे न दिल्याने मलेशियाकडून पाकच्या सरकारी विमान आस्थापनाचे विमान जप्त

जगामध्ये हास्यास्पद ठरलेला पाक ! इस्लामी देश म्हणून पाकला साहाय्य करणार्‍या मलेशियानेही पाकला वार्‍यावर सोडले आहे, हे पहाता आतातरी पाकला आतंकवाद आणि विकास यांतील भेद लक्षात येईल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे भविष्यात त्याचा विनाश अटळ आहे !

‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’चे बोइंग ७७७ हे जप्त केलेले प्रवासी विमान

कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियाने पाकचे सरकारी विमान वाहतूक आस्थापन ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’चे बोइंग ७७७ हे प्रवासी विमान जप्त केले आहे. पाकने हे विमान भाड्याने घेतले होते आणि त्याचे पैसे चुकते न केल्याने विमान जप्त करण्यात आले. जप्त करतांना यात प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले. पाकच्या या आस्थापनाकडे एकूण १२ ‘बोईंग ७७७’ विमाने असून ती विविध आस्थापनांकडून भाड्याने घेण्यात आली आहेत. तसेच या आस्थापनाच्या ४० टक्के वैमानिकांकडे परवाना नाही, असेही समोर आले होते. यापूर्वी सौदी अरेबियाने पाककडे त्याने दिलेले कर्ज फेडण्यास सांगितल्यावर पाकने चीनकडून कर्ज घेऊन सौदीचे कर्ज फेडले होते.