नागरिकांना रस्त्यावर का उतरावे लागते ? प्रशासन काही कृती का करत नाही ?
बांदा – पाडलोसमार्गे वाहतुकीची अनुमती नसतांनाही भरधाव वेगाने रेडीला जाणारे ३ खनिज वाहतूक डंपर पाडलोस येथील श्री रवळनाथ मंदिराजवळ ग्रामस्थांनी रोखले. डंपरचालक आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली; परंतु ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या डंपरचालकांना माघारी परतावे लागले. प्रशासनाने वाहतुकीसाठी दिलेला मार्ग न अवलंबता पाडलोसमार्गे सुसाट वेगाने डंपर जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.
काही नागरिकांनी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांच्याकडे अनेक तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राजू शेटकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ यांनी खनिज भरलेले डंपर माघारी परतवून लावले. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे राजू शेटकर यांनी सांगितले.