हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

डावीकडे पदभार स्वीकारताना हेमंत नगराळे

मुंबई – कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यावर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सुबोध जयस्वाल यांची ‘सीआयएस्एफ्’च्या महासंचालकपदी निवड झाल्यामुळे राज्याच्या महासंचालकपदाची जागा रिक्त झाली होती.

हेमंत नगराळे हे वर्ष १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९८ ते २००२ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्येही काम केले. प्रारंभी मुंबई येथे, त्यानंतर देहली येथे उपमहासंचालकपदाचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. या कालावधीत ४०० कोटी रुपयांच्या हर्षद मेहता यांचा शेअर बाजारातील घोटाळा, तर तेलगी याचा ‘स्टॅम्प पेपर’ घोटाळा या प्रकरणांत हेमंत नगराळे यांनी महत्त्वपूर्ण अन्वेषण केले. त्यापूर्वी सोलापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रत्नागिरी येथे जिल्हा अधीक्षक म्हणूनही त्यांनी दायित्व पाहिले.