|
वाळपई, ७ जानेवारी (वार्ता.) – शेळ-मेळावली येथे नव्याने चालू झालेल्या आंदोलनाच्या ७ जानेवारी या तिसर्या दिवशी तणावपूर्ण शांतता दिसून आली. मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे नेते आदी मिळून एकूण २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभागाने परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक केली आहे. पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी हे प्रकरण पुढील अन्वेषणासाठी वाळपई पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे स्थलांतरित केले आहे.
शेळ-मेळावली ग्रामस्थांनी वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवरून वाळपई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्याचे ठरवले होते; मात्र ग्रामस्थांनी ऐनवेळी हा मोर्चा रहित केला. तत्पूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी वाळपई येथे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची एक बैठक घेऊन तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शेळ-मेळावली ग्रामस्थांवर ६ जानेवारी या दिवशी लाठीहल्ला केल्याच्या प्रकरणाचा विविध स्तरांतून निषेध केला जात आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेळ-मेळावली येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे पुन्हा एकदा म्हटले असून कुणालाही कायदा हातात घेता येणार नसल्याची चेतावणी दिली आहे. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाचे काम यापुढेही चालूच रहाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.
प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची ग्रामस्थांशी चर्चा निष्फळ !
शासनाने ७ जानेवारी या दिवशी आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेण्यासाठी भाजपचे नेते प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शेळ-मेळावली ग्रामस्थांना भेटण्यासाठी पाठवले. प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेतली. आंदोलनकर्त्यांनी प्रस्तावित आयआयटी प्रकल्पामुळे त्यांची शेती-बागायती नष्ट होणार असल्याचे या शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळाचा आंदोलनकर्त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कोणताही लाभ झाला नाही.
राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट
शेळ-मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून काँग्रेसच्या वाळपई गटाचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, काँग्रेसच्या वाळपई महिला गटाच्या अध्यक्षा रोशन देसाई, रामा काणकोणकर, रणजीत राणे, संकल्प आमोणकर आदींच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट केले आहेत. शेळ-मेळावली ग्रामस्थांच्या मते शासनाने निवडक नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणार्या सर्व ग्रामस्थांना कह्यात घ्यावे, असा पवित्रा घेतला आहे. यानुसार पोलीस कारवाई करण्यासाठी गावात आल्यास ‘सर्व ग्रामस्थांना पोलिसांनी कह्यात घ्यावे, हिंसाचार करणार नाही’, असा पवित्रा ७ जानेवारीला ग्रामस्थांनी घेतला होता. हिंसक आंदोलन प्रकरणी पोलिसांनी विश्वेश प्रभु याला कह्यात घेतले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सायंकाळी वाळपई पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकार्यांशी चर्चा केली.
पोलिसांच्या शेळ-मेळावली ग्रामस्थांवरील कारवाईचा राजकीय पक्षांकडून निषेध
‘गोवा वूमन फॉरवर्ड’च्या अधिवक्त्या अस्मा सय्यद, गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अधिवक्ता प्रतिमा कुतिन्हो आदींनी पोलिसांच्या शेळ-मेळावली ग्रामस्थांवरील कारवाईचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी ७ जानेवारी या दिवशी वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना सेवेतून निलंबित करणे आणि आंदोलनकर्त्यांवर प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेणे, या मागण्यांवरुन पणजी येथील पोलीस मुख्यालयासमोर निदर्शने केली.
मेळावली येथील प्रस्तावित प्रकल्प सरकारने मागे न घेतल्यास कायदा हातात घेऊ ! – ‘गाकुवेध’ आणि इतर संघटना
मेळावली ग्रामस्थांवरील लाठीहल्ल्याचा ‘गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर फेडरेशन’ (गाकुवेध), ‘आदिवासी संघटना केपे’, ‘अनुसूचित जाती असोसिएशन सां जुझे दर आरियल’ आणि ‘गोेंयचो कुळ मुंडकार आवाज’ या संघटनांनी निषेध केला आहे. संघटनांच्या मते, ‘‘हा लाठीहल्ला संपूर्ण अनुसूचित जमातीवरील आक्रमण आहे. मेळावली येथे अनुसूचित जमातीतील लोक पूर्वीपासून शांतीमय जीवन जगत आहेत. यापुढे शासनाने मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित न केल्यास संघटना संपूर्ण राज्यभर निषेध कार्यक्रम घेणार.’’