ऊस उत्पादकांना पुढील आठवड्यात हानीभरपाई देणार ! – खासदार नरेंद्र सावईकर

ऊस उत्पादकांनी आजपासून धरणे आंदोलनाची चेतावणी दिल्याचे प्रकरण

पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – निर्धारित मुदतीत शासनाने ऊस उत्पादकांना कोणतेही सहकार्य न केल्याने ऊस उत्पादक संघटनेच्या झेंड्याखाली सर्व ऊस उत्पादक सांगे येथे २ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणार आहेत. धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना कार्यान्वित होईपर्यंत उसाच्या लागवडीसाठी हानीभरपाई देण्याची सरकारने लेखी स्वरूपात मागणी मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे ऊस उत्पादकांनी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर १ जानेवारी या दिवशी ऊस उत्पादक सुलभता समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर म्हणाले, ‘‘शासन प्रतीटन ६०० रुपये हानीभरपाई देणार आहे. यासाठी ८०० ऊस उत्पादकांसाठी ६४ लाख रुपये शासनाने संमत केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील आठवड्यात ही हानीभरपाई ऊस उत्पादकांना देणार असल्याचे सांगितले आहे.’’