‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या लिखाणाची संकलन सेवा करू इच्छिणार्‍या साधकांनी आपली माहिती पाठवावी !

साधकांना सूचना

१. ‘सनातन प्रभात’साठी येणार्‍या लिखाणाचा ओघ नित्य वाढत असल्याने संकलन सेवेसाठी साधकांची संख्या अपुरी पडत असणे

‘सनातन प्रभात’मध्ये विविधांगी विषयांवरील लिखाण प्रसिद्ध होते. संत, साधक, वाचक, तसेच धर्मप्रेमी यांचे लिखाण येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ‘सनातन प्रभात’मध्ये लिखाण प्रसिद्ध करण्यापूर्वी जी प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी साधकांची संख्या अत्यल्प पडत आहे. त्यामुळे संबंधित काही सेवा प्रलंबित राहिल्या असून विविध विषयांवरील ६,४०० हून अधिक धारिकांचे (प्रथम प्राधान्य असलेल्या) संकलन करणे शेष आहे. यात प्राधान्याच्या १,६०० हून अधिक धारिकांचे प्राथमिक संकलन आणि ४,८०० हून अधिक धारिकांचे अंतिम संकलन करणे बाकी आहे.

साधकांनी संकलनासाठी लिखाण पाठवतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे

‘अनेक साधक ‘सनातन प्रभात’मध्ये छापण्यासाठी त्यांचे लिखाण पाठवतात. प्रतिदिन साधकांकडून कविता, बालसाधक, साधक, तसेच संत यांची गुणवैशिष्ट्ये, शिकायला मिळालेली सूत्रे, संतांच्या अनुभूती, परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आदी विविधांगी विषयांवरील लिखाण येते. हे लिखाण पाठवतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

अ. साधकांनी संकलनाला केवळ वैशिष्ट्यपूर्ण लिखाण पाठवावे, तसेच ते अगदी संक्षिप्त स्वरूपात असावे.

आ. हे लिखाण वाचकांना समजेल, असे सुस्पष्ट असावे.

इ. त्यात आवश्यक ती सर्व सूत्रे, उदा. पूर्ण नाव, गाव, जिल्हा, संपर्क क्रमांक, लिखाणाचा दिनांक, अनुभूतीचा दिनांक असावा.

ई. लिखाणात काही संदर्भ दिले असल्यास ते योग्य असल्याची निश्‍चिती केलेली असावी, तसेच ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाचा संदर्भ दिला असल्यास शक्यतो त्या अंकाचा दिनांकही घालावा. अन्यथा अशी माहिती शोधण्यात संकलन सेवेतील साधकांचा वेळ वाया जातो.’

– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. संकलन सेवेचे स्वरूप

२ अ. प्राथमिक संकलन करणे : लिखाणातील अनावश्यक भाग काढणे, व्याकरण सुधारणे, वाक्यरचना नीट करणे, मथळे देणे आदी

२ आ. अंतिम संकलन करणे : लिखाणातील अनावश्यक भाग काढणे, परिच्छेद करून मथळे देणे, आवश्यकता असल्यास शिरोभाग लिहिणे, वाक्यरचना सुस्पष्ट करणे, भाषांतरित धारिका असल्यास भाषांतर योग्य असल्याची निश्‍चिती करणे इत्यादी

२ इ. सेवेसाठी आवश्यक कौशल्य : संकलन सेवेसाठी संगणकावर मराठी टंकलेखन करता येणे, तसेच मराठी व्याकरण आणि शब्दरचना यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ही सेवा घरी राहून करता येईल. ही सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

टीप १ : संकलनाची सेवा ‘श्रीलिपी’ या प्रणालीमध्ये केली जाते.