अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या आरोपपत्राला आव्हान देण्यास अनुमती

मुंबई – वास्तूरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची अनुमती अर्णव गोस्वामी यांना न्यायालयाने दिली आहे. रायगड पोलिसांकडून वरील प्रकरणी गोस्वामींसह अन्य दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. रायगड पोलिसांनी या प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्याला, तसेच नुकत्याच प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची मागणी गोस्वामींसह इतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयाने नुकतीच त्यांना ही अनुमती दिली आहे. अलिबाग दंडाधिकार्‍यांनी न्यायालयाला आरोपपत्रावरील त्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांना लवकरात लवकर आरोपपत्राची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत यावरील सुनावणी ६ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

‘रिपब्लिक टी.व्ही.’ला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या अन्य अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.


रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना मुंबई मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने ५० सहस्र रुपयांचा सशर्त जामीन संमत केला. मागील दोन दिवसांपासून ते अटकेत होते.