आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे ‘गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन’कडून स्वागत

पणजी, १२ डिसेंबर (वार्ता.) – ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिन’ने (सी.सी.आय्.एम्.) पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिली आहे. या निर्णयाचे ‘गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन’ने स्वागत केले आहे.

‘गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन’च्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन ‘सी.सी.आय्.एम्.’च्या या निर्णयाविषयी आनंद आणि समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही संघटनेने अभिनंदन केले आहे. याविषयी डॉ. महेश वेर्लेकर म्हणाले, ‘‘केंद्राच्या या निर्णयामुळे शस्त्रक्रिया शास्त्राचे पितामह मानले जाणारे सुश्रुत यांचा नितांत आदर आणि मान राखला गेला आहे.’’ केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या भेटीच्या वेळी ‘गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन’च्या शिष्टमंडळामध्ये डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, डॉ. स्नेहा भागवत, डॉ. नितीन मांजरेकर, डॉ. महेश वेर्लेकर आदी वैद्यांचा सहभाग होता.