६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – १९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्‍या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. गोवा शासन ६० वा गोवा मुक्तीदिन कार्यक्रम वर्षभर साजरा करणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या बैठकीला मगोप आणि काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर पूर्व घोषित केल्याप्रमाणे ‘गोवा फॉरवर्ड’ने बैठकीवर बहिष्कार टाकला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘१९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार आहेत. या दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी कांपाल मैदानात होणार आहेत. सायंकाळच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार आहेत. सायंकाळी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आझाद मैदानातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करतील.’’

६० व्या मुक्तीदिनाच्या निमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमात गोवा ‘स्वयंपूर्ण’ करण्यावर भर

६० व्या मुक्तीदिनाच्या निमित्ताने वर्षभराच्या कार्यक्रमाचा ढोबळ आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे; मात्र यासंबंधी पुढे होणार्‍या पाठपुरावा बैठकांनंतर आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. वर्षभराच्या कार्यक्रमांमध्ये गोवा ‘स्वयंपूर्ण’ करण्यावर आणि गोव्याचे एक निराळे अस्तित्व प्रदर्शित करण्यावर भर दिला जाणार आहे. वर्षभराच्या कार्यक्रमांतून गोवा मुक्तीलढ्यास हातभार लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. गोव्याबाहेर रहात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचाही त्यांच्या राज्यात जाऊन सन्मान करण्यात येणार आहे, तसेच पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्यांचा वर्षभराच्या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.’’