जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे २ मासांतच संभाजीनगर येथे स्थानांतर

डॉ. श्रीमंत चव्हाण

सिंधुदुर्ग – दोन मासांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारलेले डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तातडीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी स्थानांतर करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या कारभारावर टीका झाल्याने त्यांचे ठाणे येथे स्थानांतर होऊन त्यांच्या जागी डॉ. चव्हाण यांची नियुक्ती झाली होती.

जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी डॉ. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता, तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत डॉ. चव्हाण यांच्या अनुपस्थितीवरून सदस्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. डॉ. चव्हाण यांची नियुक्ती झाल्यावर मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही टीका केली होती. (कारभार व्यवस्थित न हाताळणार्‍या अधिकार्‍यांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? हे अधिकारी जेथे जातील तेथील कारभार तसाच हाताळणार. मग तेथील लोकप्रतिनिधींनी किंवा जनतेने तक्रार किंवा टीका करणे, पुन्हा त्यांचे दुसर्‍या जागी स्थानांतर करणे, हा प्रकार न संपणारा आहे. अशा अधिकार्‍यांना कारभार व्यवस्थित हाताळण्यास भाग पाडणे किंवा त्यांना सेवेतून काढून टाकणे, अशा प्रकारची काहीतरी उपाययोजना पाहिजे ! – संपादक)