धार्मिक स्थळांमधील ‘व्ही.आय.पी.’ संस्कृती रोखा ! – आयरिश रॉड्रिग्स, अधिवक्ता

जुने गोवे येथे ३ डिसेंबरच्या फेस्ताला निवडक ‘व्ही.आय.पी.’साठी प्रार्थनेचे (फिस्ट मास) आयोजन केल्याचे प्रकरण

आयरिश रॉड्रिग्स

पणजी, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – जुने गोवे येथे ३ डिसेंबर या दिवशी होणार्‍या फेस्ताच्या निमित्ताने सामूहिक प्रार्थना (नोव्हेना) ‘ऑनलाईन’ स्वरूपात करण्यात येणार असल्याचे घोषित झाले आहे. याप्रसंगी जुने गोवे येथील बासिलिका बॉम जिझस या मुख्य चर्चमध्ये निवडक निमंत्रित ‘व्ही.आय.पीं.’साठी (अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी) प्रार्थनेचे (फिस्ट मास) आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांच्या या कृतीला सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी विरोध दर्शवला आहे. ‘धार्मिक स्थळांमधील ‘व्ही.आय.पी.’ संस्कृती रोखावी’, अशी मागणी अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी केली आहे.

अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स पुढे म्हणाले, ‘‘फेस्ताच्या आयोजकांनी अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ‘फिस्ट मास’चे आयोजन केल्याचा घेतलेला निर्णय अयोग्य आहे. आताच्या घडीला गेले अनेक मास स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना महामारीच्या विरोधात लढणारे डॉक्टर आणि त्यांना सहकार्य करणारी कर्मचारी हे खरे ‘व्ही.आय.पी.’ आहेत. समाजासाठी लढणारे ते योद्धे आहेत. आताच्या घडीला राजकारण्यांना सर्वसामान्य नागरिकांची वागणूक देणे आवश्यक आहे.

देवाच्या दृष्टीने आपण सर्वजण एकच आहोत. कोणत्याही धर्मात देव आपल्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही. राजकारण्यांंनी रांगेत पुढे उभे राहून ते देवाच्या जवळ आहेत, हे भासवण्याऐवजी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि अरेरावीपणा न करणे, हे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. राजकारणी मोठ्या योजना राबवत असल्याचे सांगतात; मात्र या योजनांचा शेवट घोटाळ्यांमध्ये होत असतो. अशा योजनांमधून जनतेच्या पैशांची उधळण केली जाते. देवाला गरिबाची सेवा केलेली आवडते. ३ डिसेंबर या फेस्ताच्या दिवशी प्रार्थनेला (फिस्ट मास) कोरोना योद्धे, गरीब, विकलांग आदींना स्थान देण्यात येईल, अशी अपेक्षा बाळगतो.’’