कुंकू आणि टिळा लावण्याचे महत्त्व
मानवाचे शरीर, विशेषतः कपाळ आणि भुवया यांमधील स्थान विद्युत् चुंबकीय लहरींच्या रूपात ऊर्जा उत्पन्न करते. कपाळावर कुंकू किंवा टिळा लावल्याने कपाळ थंड राहून व्यक्तीचे अनिष्ट लहरींपासून रक्षण होते. कुंकवामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते.
स्त्रीने स्वतःला अनामिकेने, तर दुसर्या स्त्रीला मध्यमेने आज्ञाचक्रावर गोलाकार कुंकू लावावे. पुरुषाने स्वतःला किंवा दुसर्याला मध्यमेने आज्ञाचक्रावर उभे कुंकू लावावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अलंकारांचे महत्त्व’)
सात्त्विक नक्षीचे कपडे निवडा !
‘प्रत्येक प्रकृती आपल्या वृत्तीप्रमाणे स्वतःची वेशभूषा करते. वृत्तीचे चित्र वेशभूषेत दिसते. तमोगुणी जीव हा भडक रंगांची आणि चित्र-विचित्र आकारांची वेलवीण (नक्षी) असलेली वेशभूषा करतो. रजोगुणी जिवाच्या वेशभूषेत वैविध्यता आणि कलात्मकता असते. सत्त्वगुणी जीव पांढरा, तसेच फिकट पिवळा, निळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग वापरतो. सत्त्वगुणी जीव हा सात्त्विक रंगांची, फारशी वेलवीण (नक्षीकाम) नसलेली आणि चमकदारपणा नसलेली वेशभूषा करतो. कपडे शिवण्यातही त्याचे वैविध्य आढळत नाही. या जिवाला साधी वेशभूषा करायला आवडते. न्यूनतम (कमीतकमी) शिवण असलेली साधी घरगुती वेशभूषा सर्वांचेच मन जिंकते. असा जीव सर्वांनाच आपलासा वाटतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’)
सात्त्विक अलंकारांचे महत्त्व
हिंदु धर्मात सांगितलेले विविध पारंपरिक अलंकार धारण केल्याने ईश्वरी तत्त्व ग्रहण करता येते, चैतन्य मिळते. त्यामुळे सात्त्विकता वाढायला साहाय्य होते. अलंकार म्हणजे तेजरूपी सात्त्विकतेचे लेणेच होय ! धार्मिक विधींच्या आणि सणासुदीच्या वेळी हिंदु धर्मात सांगितलेले सात्त्विक वस्त्र अन् अलंकार परिधान केल्याने ईश्वरी चैतन्य अधिकाधिक ग्रहण होते. – सौ. राजश्री खोल्लम, पुणे.
मुखमंडलावरील आणि कांतीवरील अलंकारांचे प्रसन्नमयी तेज वायूमंडलातील रज-तमात्मक कणांचे उच्चाटन करते, म्हणून ते तारक, म्हणजेच देवत्व प्रदान करणारे, तसेच मारक, म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारे आहे. ‘अलंकार’ म्हणजे ईश्वराचे तेजरूपी सगुणत्वाचे लेणे. अलंकारांच्या स्पर्शाने देहातील चेतना जागृत होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अलंकारांचे महत्त्व’)
नमस्कार असा करा !
» दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवून हात जोडावेत.
» हाताची बोटे एकमेकांना जुळलेली; पण अंगठ्यापासून दूर ठेवावीत.
» दोन्ही हातांच्या तळव्यांत थोडी पोकळी ठेवावी.
» मान आणि पाठ थोडी पुढे झुकवून अंगठे भ्रूमध्याला लावावेत. काही वेळ मन ईश्वरचरणी एकाग्र करावे. त्यानंतर जोडलेले हात छातीच्या मध्यभागी मनगटे टेकतील, अशा प्रकारे काही वेळ ठेवून मग खाली आणावेत.
या पद्धतीने नमस्कार केल्याने देवतेचे चैतन्य ग्रहण होऊन संपूर्ण शरिरात पसरते. सात्त्विकता मिळते. (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘नमस्कार कसा करावा ?’)