कळंगुट येथील ‘नाझरी रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामावर कारवाई

पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश

अवैध बांधकाम बुलडोझरद्वारे पाडले जात आहे

म्हापसा, २ जून (वार्ता.) – अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या नाईकवाडा, कळंगुट परिसरातील आमदार मायकल लोबो यांच्याशी संबंधित मानल्या जाणार्‍या ‘नाझरी रिसॉर्ट’च्या (रिसॉर्ट म्हणजे निवास आणि भोजन यांची व्यवस्था असलेले हॉटेल) अवैध बांधकामावर प्रशासनाने कारवाई केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने २ मे या दिवशी सकाळपासून या रिसॉर्टचा नियमबाह्य भाग पाडण्याची प्रक्रिया चालू केली. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक यांनी या रिसॉर्टच्या विरोधात सातत्याने लढा उभारला होता. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या रिसॉर्टच्या अवैध बांधकामाविषयी राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. हरित लवादाने रिसॉर्टचे अवैध बांधकाम हटवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या विरोधात रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली; परंतु दोन्ही न्यायालयांनी लवादाचा निर्णय कायम ठेवला. या आदेशानंतरही कारवाई न झाल्याने न्यायालयाच्या अवमानाची याचिका प्रविष्ट करण्यात आली. त्यानंतर रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने प्रतिज्ञापत्राद्वारे बांधकाम स्वतः हटवण्याचे आश्वासन दिले; परंतु प्रत्यक्षात ते न हटवल्याचे प्रशासनाने कारवाईला प्रारंभ केला. यानंतर किनारपट्टी भागांतील अवैध बांधकामांविषयी पुन्हा चर्चा चालू झाली आहे.