मन की बात’मध्ये लोलये, काणकोण येथील जलयोद्धा बाळकृष्ण अय्या यांची नोंद

बाळकृष्ण अय्या

काणकोण, ३१ मे (वार्ता.) – काणकोण तालुक्यातील लोलये येथील ७७ वर्षांचे बाळकृष्ण गणेश अय्या यांच्या प्रेरणादायी कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये नोंद घेतली आहे.

बाळकृष्ण अय्या यांचे कार्य !

बाळकृष्ण अय्या यांच्या घराशेजारी खडकाळ आणि पाण्याची तीव्र टंचाई असलेला ‘मड्डी तळप’ हा भाग आहे. या भागात अनेक तज्ञांनी पाणी मिळणे अशक्य असल्याचे सांगितले होते; मात्र बाळकृष्ण अय्या यांनी हार न मानता स्वत: ४० फूट खोल विहीर खोदली. अखेर कठीण खडकात पाण्याचा झरा सापडला आणि परिसरातील पाणीटंचाई दूर करण्याचा मार्ग खुला झाला. विशेष म्हणजे त्यांनी हे पाणी केवळ स्वत:पुरते न ठेवता स्वत:च्या खर्चाने वाहिनी टाकून २५ हून अधिक गरजू कुटुंबांना विनामूल्य पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. बाळकृष्ण अय्या हे निवृत्त कला शिक्षक आहेत. नारळाच्या झावळ्यांपासून झाडू सिद्ध करण्याचे कामही ते करतात. त्यांना यापूर्वी ‘कला गौरव’ पुरस्कार आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांचाही सन्मान मिळाला आहे.