श्री राजमातंगी महायज्ञाच्या सेवेसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतून, तसेच गुजरात राज्यातून अनेक साधक सेवेसाठी एकत्र आले होते. साधकांनी दीड मास एकत्र येऊन महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या अंतर्गत विविध सेवा केल्या. या सेवेसाठी भगवंताच्या कृपेने श्री सिद्धिविनायक आश्रम (दादर), श्री गुरुकृपा आश्रम यांसह विविध ठिकाणी साधकांसाठी निवासव्यवस्था उपलब्ध झाली.
साधक दीड मास एकत्र राहिल्यामुळे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, नामजपादी उपाय करणे, व्यष्टी साधनेचा आढावा देणे, महायज्ञाच्या सेवेचे चिंतन करणे’, हे प्रयत्न साधकांना श्री गुरूंच्या कृपेने करता आले. या कालावधीत साधकांना सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे), तसेच पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे) या संतद्वयींचा सत्संगही लाभला. त्यामुळे ‘महायज्ञाची सेवा केवळ कार्य म्हणून न करता या सेवेच्या माध्यमातून स्वतःमध्ये पालट व्हायला हवा’, असे मार्गदर्शन साधकांना वेळोवेळी मिळाले. अनेक वर्षे साधनेचे प्रयत्न करत असूनही साधकांमध्ये अपेक्षित असे पालट होत नव्हते; परंतु ‘या दीड मासाच्या कालावधीत साधकाने श्री गुरूंची कृपा आणि स्वतःमध्ये झालेले पालट कसे अनुभवले ?’, हे पुढे दिले आहे.

१. नियमितपणे नामजपादी उपाय केल्याने आणि व्यष्टी साधनेचा आढावा दिल्याने सेवेतील आनंद अनुभवता येणे

‘पूर्वी सेवा करतांना विविध स्तरांवर निर्माण होणारी परिस्थिती माझ्याकडून स्वीकारली जात नव्हती. मला नामजप करण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे काही प्रसंग घडले की, माझी चिडचिड होत होती. श्री राजमातंगी महायज्ञाच्या सेवेसाठी श्री सिद्धिविनायक आश्रमात आल्यावर मी नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देणे चालू केले. मी माझ्या साधनेची स्थिती व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितली. आढावासेवकांनी दृष्टीकोन दिल्यावर परिस्थिती स्वीकारता येण्यासाठी माझ्या प्रार्थना वाढल्या. त्यामुळे मला सेवेतील आनंद अनुभवता आला. त्या काळात व्यष्टी साधनेचे अपेक्षित असे प्रयत्न झाले नाहीत, तरी मनाच्या स्थितीचा जसा आहे, तसा आढावा नियमितपणे दिल्यामुळे मला प्रयत्न करण्याची उभारी मिळाली. दिवसभर मला साधनेच्या प्रयत्नांची जाणीव होत होती. या प्रक्रियेमुळे व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा नियमितपणे आढावा देण्याचे महत्त्व देवाने मला शिकवले. यापूर्वी आढावा देण्याचे महत्त्व ठाऊक असूनही माझ्याकडून तो गांभीर्याने दिला जात नव्हता.
२. सहसाधकांविषयी मनात येणार्या प्रतिक्रियांवर नियंत्रण आल्यामुळे त्यांच्याविषयी आदर निर्माण होणे
यापूर्वी सेवा करत असतांना माझ्या मनात साधकांविषयी पुष्कळ प्रतिक्रिया येत होत्या. आधी त्या प्रतिक्रियांचा परिणाम माझ्या मनावर बर्याच दिवसांपर्यंत रहात असे. महायज्ञाच्या कालावधीत सेवा आणि साधनेचे प्रयत्न करत असतांना माझ्या मनात कधी प्रतिक्रिया आल्या, तरी त्या क्षणीच मला आतून त्याची जाणीव होऊन माझ्या मनात योग्य विचार यायचे. प्रतिक्रियांवर नियंत्रण आल्यामुळे सहसाधकांविषयी मनात आदर निर्माण होण्यास साहाय्य झाले. सहसाधकांना सेवेला येण्यासाठी अडचणी आल्यावर श्री गुरूंच्या कृपेने त्या अडचणींवर मार्ग निघायचा. त्या वेळी ‘देवच सर्व सेवा करून घेत आहे’, याची जाणीव मला होत असे.
३. व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढल्यामुळे ‘स्व’चे विचार न्यून होऊन सेवेतील पालट स्वीकारता येणे
मी वाहतूक समितीची सेवा करत असल्यामुळे माझी रात्री २ – ३ घंटेच झोप होत होती. असे असले, तरी दुसर्या दिवशी दिवसभर माझ्याकडून उत्साहाने सेवा होत होती. इतर वेळी थोडे जरी जागरण झाले, तरी पित्त पुष्कळ वाढत असे. त्या वेळी माझ्या मनातील ‘स्व’चे विचार वाढायचे. या कालावधीत चैतन्याचे प्रमाण एवढे होते की, माझे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले. इतरांनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न, सेवेतील पालट इत्यादी माझ्याकडून स्वीकारले जात असे. त्यामुळे मला ‘स्व’चा विचार करण्यास वेळच मिळत नव्हता.’
– श्री. सुनील कदम, रायगड (२३.५.२०२६)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !