आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये धर्मांतराला केलेला विरोध !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. चहा मळ्यांच्या सुटीचा  दिवस पालटल्याने ख्रिस्ती धर्मांतरामध्ये घट

‘भारतातून निर्यात होणार्‍या चहापैकी ६० टक्क्यांहून अधिक चहा आसाममधील असतो. चहाच्या मळ्यातील लोकांवर इस्लामचा तेवढा प्रभाव नाही, जेवढा ख्रिस्त्यांचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या ईशान्येकडील एका प्रांतात चहाचा मळा चालू झाला होता. तेव्हापासून प्रत्येक चहाच्या मळ्याला रविवारी साप्ताहिक सुटी असायची. त्याचा वापर ख्रिस्ती प्रचारकांनी केला. रविवारी लोक ख्रिस्त्यांच्या कार्यक्रमांना जाऊन मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाले. हे थांबवण्यासाठी आम्ही चहा मळ्यांचे व्यवस्थापन करणार्‍यांना भेटलो. त्यांना सांगितले, ‘रविवारी सरकारी सुटी असल्याने कामगारांना सरकारी कार्यालयातील कामे करता येत नाही. त्यामुळे सुटीचा दिवस स्थानिक बाजाराच्या दिवशी केला, तर कामगारांना अधिक लाभ होईल.’ त्यानुसार व्यवस्थापनाने रविवारची सुटी पालटून मंगळवारी केली. त्यामुळे त्या दिवशी कामगार वर्ग सरकारी कार्यालयात जातो किंवा हनुमान मंदिरात जातो. त्यामुळे हिंदूंचे धर्मांतर न्यून झाले.

२. हिंदु मुलींवरील बलात्कार प्रकरणात अधिवक्त्यांनी सतर्कता ठेवणे आवश्यक !

चहाच्या मळ्यात काम करणार्‍या एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी ३ आरोपींना अटक झाली. पीडितेचे वय १७ वर्षांहून न्यून होते. त्यामुळे आरोपींवर ‘पॉक्सो’ कायदा लागू झाला. आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. सुदैवाने सरकारी पक्षाच्या अधिवक्त्या हिंदु होत्या. मी त्यांची पीडितेशी भेट घालून दिली आणि हे प्रकरण गांभीर्याने घेण्यास सांगितले. या प्रकरणाची प्रतिदिन सुनावणी झाली. मी स्वत: अधिवक्ता असल्याने नोंदणी अहवाल पाहिला. त्यात पीडितेने आरोपीला ओळखल्याची माहिती अंतर्भूत केलेली नव्हती. त्यानंतर मी जातीने सरकारी पक्षाच्या अधिवक्त्यांना भेटलो. त्यांना ही त्रुटी लक्षात आणून दिली; पण मला खात्री वाटत नव्हती. त्यामुळे पीडितेची ओळख परेड होण्याविषयी मी न्यायालयात स्वत:हून अर्ज केला. त्यानुसार झालेल्या ओळख परेडमध्ये तिने प्रथम बलात्कार करणार्‍याला ओळखले, तसेच घटनेच्या दिवशी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असल्याने अन्य दोन आरोपींना ओळखण्यास ती असमर्थ असल्याचे तिने स्पष्ट केले. पुढे त्या आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा झाली. यावरून अधिवक्ते सतर्क राहिले, तर हिंदु पीडितांना योग्य न्याय मिळू शकतो, हे लक्षात आले.’

– अधिवक्ता राजीव कुमार नाथ, अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ, आसाम.