शनिदेवाचे आध्यात्मिक माहात्म्य आणि त्याची गुणवैशिष्ट्ये !

‘१६.५.२०२६ या दिवशी झालेल्या शनैश्चर जयंतीच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखातून आपण शनिदेवाची महती जाणून घेत आहोत. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.   

उत्तरार्ध 

पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1040373.html

शनिदेवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

८. शनिवारी शनीची शक्ती पृथ्वीवर १० पटींनी अधिक येत असणे 

‘आठवड्यातील ७ दिवस हे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि, या सात ग्रहांशी संबंधित आहेत. प्रत्येक वारी संबंधित ग्रहदेवतेची शक्ती अन्य वारापेक्षा पृथ्वीवर १० पटींनी अधिक येते. शनिवार हा दिवस शनीशी संबंधित आहे. त्या दिवशी शनीची शक्ती अन्य वारापेक्षा पृथ्वीवर १० पटींनी अधिक येते.

९. शनीशी संबंधित श्लोक 

अ. अगस्त्यं कुम्भकर्णं च शनिं च वडवानलम् ।
आहारपरिपाकार्थं स्मरेद् भीमं च पञ्चमम् ।।

अर्थ : अन्नपचन होण्यासाठी अगस्तिमुनी, कुंभकर्ण, शनि, वडवानल (अग्नि) आणि भीम, या पाच जणांचे स्मरण करावे.

१०. शनीशी संबंधित स्तोत्रे 

शनिस्तोत्र, शनैश्चरकवचस्तोत्र आणि शनिमाहात्म्य सप्ताहातील वाराचे नाव आणि नवग्रहांपैकी संबंधित ग्रह


११. शनिदेवाचे ग्रहपीडानिवारण

सुश्री (कु.) मधुरा भोसले

११ अ. शनीची साडेसाती आणि त्यावरील उपाय : ‘शनि प्रत्येक राशीत अडीच वर्षे रहातो. व्यक्तीची जी जन्मरास असेल ती रास, त्याआधीची रास आणि त्यानंतरची
रास अशा एकूण ३ राशींमध्ये शनीचे जे गोचर (वर्तमान) भ्रमण होते, त्याला ‘शनीची साडेसाती’ म्हणतात.’ शनि ग्रहाची पीडा दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनिमाहात्म्याचे वाचन करावे आणि तैलाभिषेकयुक्त पूजा करून शनि ग्रहाच्या मंत्राचा जप करावा.

शनिदेवाचा मंत्र : शनिदेवाचे अनेक मंत्र प्रचलित आहेत. यांतील खालील मंत्र सर्वांधिक प्रमाणात प्रचलित असून सर्वांत प्रभावी आहे.

नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् ।। – नवग्रहस्तोत्र, श्लोक ७

अर्थ : शनिदेव निळ्या अंजनाप्रमाणे भासतात. ते भगवान सूर्यनारायणाचे पुत्र असून साक्षात् यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आहेत. देवी छाया आणि भगवान सूर्य यांपासून उत्पन्न शनिदेवांना मी नमस्कार करतो.

शनिदेवाच्या मंत्राची संख्या २३ सहस्र आहे.

११ आ. मारुतीची उपासना करणे : शनि हा सूर्याचा पुत्र आहे आणि मारुति हा सूर्याचा शिष्य आहे. मारुतीची प्रगट शक्ती शनीच्या प्रगट शक्तीपेक्षा कैक पटींनी अधिक असल्यामुळे मारुतीवर शनीच्या साडेसातीचा परिणाम होत नाही. ‘शनिवारी मारुतीची उपासना करून त्याला रुईची फुले आणि पाने यांची माळ घालणे अन् काळे उडीद आणि तेल वहाणे’, हे उपाय केल्यास शनीची पीडा दूर होऊ शकते.

११ इ. शिवाची उपासना करणे : शनिवर शिवाचे अधिपत्य आहे. शिवाचे ‘प्रदोष’, हे व्रत शनिवारी आल्यास त्याला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. ‘शनिप्रदोषाच्या दिवशी उपवास करणे, प्रदोषकाळात शिवलिंगाची बिल्वपत्रे वाहून पूजा करणे आणि शिवाला पंचामृताने अभिषेक घालणे किंवा शिवासाठी हवन करणे’, यांमुळे शिवाची कृपा प्राप्त होऊन शनीची पीडा दूर होते.

११ ई. शिवभक्त पिप्पलादऋषींचे दर्शन घेतल्याने किंवा स्मरण केल्याने शनीची बाधा दूर होणे : पिप्पलादऋषि हे दधिचीऋषींचे पुत्र होते. दधिचीऋषी आणि त्यांची पत्नी सुवर्चा यांच्या देहत्यागानंतर नंदी अन् शिवगण यांनी बालक पिप्पलादऋषींना शिवलोकात नेऊन तेथे त्यांचे पालन-पोषण केले. पिप्पलादऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवाने त्यांना आशीर्वाद दिला, ‘‘तुझे दर्शन घेतल्यामुळे किंवा तुझे स्मरण केल्यामुळे शनीची पीडा दूर होईल.’’

११ उ. शनिदेवाला अभिषेक घालणे : शनिदेवाला अभिषेक घातल्यामुळे व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर विविध प्रकारचे अनुकूल परिणाम होतात.

११ ऊ. शनिदेव आणि हनुमान यांच्या कार्यांतील भेद !

११ ऊ १. ‘शनिदेवाला तेल वहाणे’ आणि ‘हनुमानाला तेल वहाणे’, यांतील आध्यात्मिक भेद !

१२. कृतज्ञता आणि प्रार्थना 

‘भगवंताच्या कृपेने मला शनिदेवाविषयी ज्ञान मिळाले’, याबद्दल मी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते. ‘शनिदेवाने आम्हा साधकांवर अखंड कृपादृष्टी ठेवावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना आहे.

पूजन करते नील पुष्पांनी ।
वंदन करते तुजला तेल वाहूनी ।।

कृपा करतोस न्याय देऊनी ।
कल्याण कर हे शनि ।।

(समाप्त)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ८.५.२०२६, वेळ : दुपारी १२ ते १२.५०, कालावधी : ५० मिनिटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.