‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्तच्या सेवा करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
प्रभादेवी, मुंबई येथे १७ मे २०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या यज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवांसाठी दादर येथील नाबर गुरुजी विद्यालयाच्या परिसरात सेवाकेंद्र उभारण्यात आले आहे. यज्ञाच्या सेवांमध्ये सहभागी असलेले साधक येथे राहून सेवा, साधना, नामजपादी उपाय करत आहेत.

१. शारीरिक त्रास होत असतांनाही ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्तच्या सेवेसाठी जायचेच’, असे ठरवणे
‘७.५.२०२६ या दिवशी मी गावी गेलो होतो. मी गावाला असतांना मला शारीरिक श्रम अधिक झाल्याने आणि उष्णतेच्या विकारांमुळे मला ताप आला अन् उलट्या होऊ लागल्या. ८.५.२०२६ या दिवशी मी मुंबई येथे आल्यावर माझा ताप वाढला. माझा ताप उतरल्यावर मला अशक्तपणा अधिक जाणवत होता. माझ्या पायात वातामुळे पेटके येत होते. मला थकवा आल्यामुळे माझी एकाग्रता होत नव्हती. मला ‘कुठेच जाऊ नये’, असे वाटत होते, तरीही ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्तच्या सेवेसाठी जायचेच’, असा मी निग्रह केला.

२. सेवाकेंद्रात आल्यावर चैतन्य जाणवणे आणि उत्साही वाटणे
मी सेवाकेंद्रात आल्यावर प्रथम नामजपादी उपाय केले. मला सेवाकेंद्रात चैतन्य जाणवत होते. ‘या ठिकाणी ठाणे सेवाकेंद्रच आहे’, असे मला वाटत होते. मी साधकांचा सेवांच्या संदर्भात सत्संग घेत असतांना या ठिकाणी असलेल्या चैतन्यामुळे मला थकवा जाणवत नव्हता. रात्री आठ वाजता सत्संग चालू होऊन रात्री १२.३० वाजता संपला, तरीही मला पुष्कळ उत्साह वाटत होता. ‘मी चैतन्यात न्हाऊन निघालो आहे’, असे मला वाटत होते. दुसर्या दिवशी सेवाकेंद्रात लवकर जाण्यासाठी माझ्या मनाची सिद्धता झाली. माझी प्रकृती अल्पावधीत पूर्वपदावर आली.
श्री गुरुमाऊलींच्या कृपेने अशा अनुभूती आल्याबद्दल मी त्यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक वैद्य उदय धुरी, सानपाडा, नवी मुंबई. (१२.५.२०२६)
मुंबई येथे होणार्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
१. मुंबई येथील सेवाकेंद्रात बसून नामजपादी उपाय करत असतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पांढर्या शुभ्र पोषाखात सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे जाणवणे आणि नामजपादी उपाय सहजतेने होणे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्य पुष्कळ प्रमाणात अनुभवायला येणे

‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात असलेल्या सेवा करण्यासाठी उभारलेल्या दादर येथील नाबर गुरुजी विद्यालयातील ध्यानमंदिरात बसून मी ८.५.२०२६ या दिवशी नामजपादी उपाय करत होतो. त्या वेळी मला पुष्कळ प्रमाणात पांढरा प्रकाश जाणवत होता. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पांढर्या शुभ्र पोषाखात त्या ठिकाणी सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते. या ठिकाणी मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमासारखेच अनुभवायला मिळाले. इतर वेळी मी नामजपादी उपाय करत असतांना मला ग्लानी येते; मात्र त्या दिवशी रात्री ९ ते ११ या वेळेत उपाय करत असतांना मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. तेव्हा मला ग्लानी आली नाही. त्या ठिकाणी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चैतन्य पुष्कळ प्रमाणात अनुभवायला येत आहे. त्यामुळे ‘नामजपादी उपाय सहजतेने होत आहेत आणि प.पू. गुरुदेवांचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी साहाय्य होत आहे’, असे मला जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्री राजमातंगी यज्ञा’ची निमंत्रण पत्रिका हातावर ठेवून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग करायला सांगितल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१२.५.२०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या सेवेच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्यांनी ‘श्री राजमातंगी यज्ञा’ची निमंत्रणपत्रिका हातावर ठेवून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग करायला सांगितला.
अ. मी डोळे मिटून निमंत्रण पत्रिकेवर हात ठेवल्यानंतर आरंभी भारतमातेचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर आले. (‘सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी’, यासाठी या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. याचीच साधकाला आलेली ही प्रचीती आहे.’ – संकलक)
आ. माझ्या दोन्ही हातांना उष्णता जाणवली.
इ. नंतर मी निमंत्रण पत्रिकेवर यज्ञकुंडाचे छायाचित्र पाहिले. ‘त्यात यज्ञाच्या ज्वाला प्रज्वलित होत आहेत’, असे मला जाणवले.
ई. माझे मन शांत होऊन मला स्थिरता जाणवली.’
– श्री. अर्जुन पुजारे, रायगड (१३.५.२०२६)
‘श्री राजमातंगी महायज्ञा’विषयी माहिती देण्यासाठी प्रवचनांचे आयोजन करतांना ‘गुरुमाऊली आणि देवता साहाय्य करत आहेत’, या संदर्भात येत असलेली प्रचीती !
‘श्री राजमातंगी महायज्ञा’विषयी माहिती देण्यासाठी प्रवचनांचे आयोजन करायचे आहे’, असे उत्तरदायी साधकांनी सांगितले. तेव्हा प्रथम मला ताण आला. त्यानंतर सत्संगात पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे) यांनीही त्याच संदर्भात सांगितले. तेव्हा माझी गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्री राजमातंगीदेवी यांना भावपूर्ण प्रार्थना झाली.

मी नामजपादी उपाय करून साधकांच्या घरी प्रवचनांचे नियोजन केले. त्यानंतर प्रतिदिन ८ ते १० प्रवचने होऊ लागली. ५० साधकांच्या घरी प्रवचने झाली. प्रवचन चालू असतांना सर्व साधकांचे कुटुंबीय आनंदी दिसत होते. नंतर समाजातील व्यक्तींकडूनही प्रवचनांची मागणी आली आणि प्रवचने झाली. त्या वेळी ‘श्री राजमातंगीदेवी प्रत्येक साधकाच्या घरात प्रवेश करून घराची शुद्धी करत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझेही मन सकारात्मक झाले आणि मला आनंद मिळाला. साधकही सकारात्मक होऊन आनंदी झाले. ‘देवता आणि गुरुमाऊली यज्ञासाठी साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवले.
‘गुरुदेवांच्या कृपेने हे अनुभवता आले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. नमिता दुखंडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६८ वर्षे), परळ, मुंबई. (१३.५.२०२६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !