Dattatreya Hosabale : पाकशी चर्चा बंद करू नये, व्यापार चालू ठेवावा; मात्र पुलवामाप्रमाणे आक्रमण झाले, तर प्रत्युत्तर द्यावे !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

नवी देहली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सांस्कृतिक संबंध जुने आहेत अन् आपण एकच राष्ट्र होतो. जर पाकिस्तानने पुलवामासारखी कृती केली, तर देशाची सुरक्षा आणि सन्मान यांसाठी भारताला परिस्थितीनुसार प्रत्युत्तर द्यावे लागेल; पण त्याचबरोबर आपण चर्चेचे दरवाजे बंद करू नयेत. आपण नेहमी चर्चेसाठी सिद्ध राहिले पाहिजे. व्यापार आणि वाणिज्य, व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) देणे थांबवू नये; कारण चर्चेसाठी नेहमी एक खिडकी उघडी राहिली पाहिजे. तेथील शिक्षणतज्ञ, खेळाडू, शास्त्रज्ञ आदींनी पुढे यावे; कारण त्यांच्या राजकीय आणि सैनिकी नेतृत्वात भारताविषयी द्वेष निर्माण झाला आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.

सरकार्यवाह होसबाळे यांनी मांडलेली सूत्रे

१. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन संपवण्याचे वक्तव्य केले आहे; पण सनातन शाश्वत आहे. कुणीतरी ते संपवायला हवे, असे म्हणाल्याने ते नाहीसे होणार नाही.

२. आखाती देशांमध्ये चालू असलेला संघर्ष हा संस्कृतींचा संघर्ष नसून तेल आणि संसाधन यांमुळे निर्माण झालेला वाद आहे. जगातील बहुतेक युद्धे लोभ, अहंकार आणि इतरांवर नियंत्रण मिळवण्याच्या मानसिकतेतून जन्माला येतात. इतिहासात प्रत्येक काळात युद्धे झाली आहेत आणि पुढे पाण्यासाठीही संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे. युद्धे मानवतेला संपवणार नाहीत; पण मानवी जीवन आणि व्यवस्था निश्चितच पालटून टाकतील.

३. युद्धसदृश परिस्थिती असो वा नसो, भारतीय जीवनशैलीत साधेपणा आणि संयम नेहमीच असावा. संकटाच्या वेळी हे अधिक महत्त्वाचे ठरते. भारत जगातील देश आणि नेते यांना शांतता अन् समजूतदारपणाचा संदेश देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

आम्ही हिंदु राष्ट्र बनवत नसून भारत आधीपासूनच हिंदु राष्ट्र आहे !

आम्ही हिंदु राष्ट्र बनवत नाही आहोत, हे आधीपासूनच हिंदु राष्ट्र आहे. ब्रिटीश राजवटीतही हे हिंदु राष्ट्रच होते. हिंदु राष्ट्राचा अर्थ सांस्कृतिक ओळखीशी संबंधित आहे, धार्मिक राज्याशी नाही. धर्मांतराने राष्ट्रीयत्व पालटत नाही. जेव्हा राष्ट्रीयत्व एक असते, तेव्हा आम्ही कुणालाही वेगळे मानत नाही. भारतात मुसलमानांना दुय्यम नागरिक मानले जात नाही. सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोचत आहे आणि संघ अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांशी सतत संवाद साधत आहे. – सरकार्यवाह होसबाळे

‘लव्ह जिहाद’ हा कट !

‘लव्ह जिहाद’ तेव्हा होतो, जेव्हा एखादा हेतू असतो. हिंदु मुलींना पळवून नेण्याचा सुनियोजित कट असतो. जेव्हा हे एकतर्फी असते, तेव्हा ते प्रेम नसते, तो एक कट असतो.

– सरकार्यवाह होसबाळे