सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कपाळावर उमटलेले कमळ स्पष्ट दिसण्याचे कारण !

प्रश्न :

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कपाळावर उमटलेले कमळ स्पष्ट दिसण्याचे कारण काय आहे ? वर्ष २०११ आणि वर्ष २०१२ या कालावधीत त्या कमळातील ४ पाकळ्या अस्पष्ट दिसायच्या आणि वर्ष २०१३ मध्ये त्या स्पष्ट दिसू लागल्या. ‘कमळ ठळक होणे’, हे काय दर्शवते ?

उत्तर :

श्री. राम होनप : 

१. संतांच्या कपाळावर उमललेले कमळ स्पष्ट दिसण्याचे कारण 

श्री. राम होनप

व्यक्तीची साधना मूलाधारचक्रापासून चालू होते. ‘व्यक्तीची साधना आणि भगवंताची कृपा’ यांमुळे तिची कुंडलिनी वर वर प्रवास करते. व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती सुषुम्ना नाडीद्वारे होते.

संतांच्या आध्यत्मिक प्रगतीच्या अंतिम टप्प्यात सुषुम्ना नाडीचे रूपांतर ‘ब्रह्मनाडी’त होते. ब्रह्मनाडीचे मीलन सहस्रारचक्राच्या ठिकाणी असलेल्या आनंदाशी होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सहस्रारचक्रात आनंदाचे प्रगटीकरण कमळाच्या आकाराप्रमाणे होते. त्याला ‘ब्रह्मकमळ’, असे म्हणतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे कार्य समष्टीशी संबंधित असल्याने त्याला ‘विश्वकमळा’ची उपमा दिलेली आहे.

१ अ. सुषुम्ना नाडी आणि ब्रह्मनाडी यांतील भेद : सुष्मुना नाडीतील काही शक्तीचा व्यय ‘संतांचे शरीर, मन आणि बुद्धी’ यांच्या कार्यांसाठी होतो; परंतु ब्रह्मनाडी जिवाला केवळ आनंद देण्याचे कार्य करते. ब्रह्मनाडीचे कार्य ‘जिवाला ब्रह्मानंद देणे’, हे असते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कपाळावर दिसणार्‍या कमळाच्या पाकळ्यांपैकी ४ पाकळ्यांची वैशिष्ट्ये

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कपाळावर दिसणार्‍या कमळाच्या पाकळ्यांपैकी ४ पाकळ्यांची नावे आणि कार्य पुढे दिले आहे.

२ अ. सचेता : ‘स’ याचा अर्थ ‘सह’ आणि ‘चेता’ याचा अर्थ ‘चेतना’ किंवा ‘चैतन्य’ असा आहे. कमळाची एक पाकळी चैतन्यासह कार्य करते. तिला ‘सचेता’, असे म्हटले आहे.

२ आ. प्रचेता : ‘प्र’ याचा अर्थ ‘जागृत’, असा आहे. ज्या कमळाच्या पाकळीतील चैतन्य काळानुरूप जागृत होते, तिला ‘प्रचेता’, असे म्हटले आहे.

२ इ. नित्या : ‘नित्य’, याचा अर्थ ‘नेहमी.’ कमळाची एक पाकळी नेहमी कार्यरत असते. त्या पाकळीला ‘नित्या’, असे म्हणतात.

२ ई. अनित्या : ‘अनित्या’ याचा अर्थ ‘कधीतरी’, असा आहे. कमळाची एक पाकळी विशिष्ट कार्यापुरती जागृत होते, तिला ‘अनित्या’, असे म्हटले आहे.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कपाळावर कमळाच्या पाकळ्या ‘प्रथम अस्पष्ट दिसणे आणि नंतर त्या स्पष्ट दिसणे’ याचे कारण

वर्ष २०११ आणि वर्ष २०१२ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची ब्रह्मनाडीद्वारे परमेश्वराशी मीलनाची प्रक्रिया चालू होती. (‘वर्ष २०११ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी साधनेद्वारे ९१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, म्हणजे ‘परात्पर गुरु’ पद प्राप्त केले. त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ९२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.’ – संकलक) ही प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांच्या कपाळावर ४ पाकळ्या अस्पष्ट दिसत होत्या. वर्ष २०१३ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे त्यांच्या कपाळावर कमळाच्या पाकळ्या स्पष्टपणे दिसू लागल्या.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.