खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्‍या रंगांमधील घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरवणार ! – नरहरी झिरवाळ, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – विक्री होणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्‍या विविध रंगांमधील घातक घटकांविषयी चर्चा करून खाद्यरंगांविषयीचे धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. त्यात विधानसभेतील या क्षेत्रातील जाणकार सदस्यांना निमंत्रित केले जाईल. केंद्र शासनाच्या कायद्यांमध्ये आवश्यक पालट करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना विनंती करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य महेश शिंदे यांनी खाद्यपदार्थांमध्ये घातक कृत्रिम रंग वापरले जात असल्याविषयी अर्धा घंटा चर्चा उपस्थित केली.

झिरवाळ म्हणाले की, सर्व हॉटेल्सना खाद्यपदार्थांच्या सूचीत त्यात वापरल्या जाणार्‍या घटकांचा उल्लेख करण्याविषयी कळवले आहे. याची प्रभावी कार्यवाही करण्यात येईल. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ३ प्रयोगशाळा आहेत. आणखी ३ प्रयोगशाळा स्थापन करण्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू.