
आज सर्वच क्षेत्रांत कृत्रिम बुद्धीमत्तेची (‘एआय’ची) चर्चा आहे. शिक्षणक्षेत्रही यात मागे नाही. अनेक शाळा आणि पालक ‘डिजिटल’, म्हणजेच प्रगती या समजूतीने धावत आहेत; परंतु खरेच तंत्रज्ञानाच्या वापराने शिक्षण, विशेष करून बालशिक्षण अधिक चांगले होते का ? शिक्षणशास्त्रातील अभ्यासकांनी अनेक वर्षांपूर्वीच स्पष्ट केले आहे की, शिकणे ही केवळ माहिती घेण्याची प्रक्रिया नाही, तर ती सामाजिक आणि भावनिक प्रक्रिया आहे. एक रशियन मानसशास्त्रज्ञ लिव्ह वॅगोतोस्की यांच्या मते ‘मुले मोठ्यांच्या मार्गदर्शनातून आणि संवादातून अधिक प्रभावीपणे शिकतात. शिक्षक किंवा पालक यांच्याशी संवाद, प्रश्नोत्तरे, समजावून सांगणे या प्रक्रियेतूनच खरे शिक्षण घडते.’ त्याचप्रमाणे स्वीस मानसशास्त्रज्ञ जीॲन पीॲगेट यांनी दाखवून दिले की, मुले स्वतः अनुभव घेऊन खेळ आणि प्रत्यक्ष कृती यांतून ज्ञान निर्माण करतात. अमेरिकेत ‘अबेसेडारियन प्रोजेक्ट’ नावाच्या एका दीर्घकालीन संशोधनातून असे दिसून आले की, लहान वयात मिळालेल्या दर्जेदार, मानवी संवादावर आधारित शिक्षणाचा अनुभव, नोकरी आणि सामाजिक आयुष्य या सर्व क्षेत्रांत मुलांच्या आयुष्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करतो. केवळ ‘स्क्रीन’समोर बसून माहिती घेतल्याने हे सर्व शक्य नाही. कृत्रिम बुद्धीमता अभ्यासक्रम सुलभ करू शकते, वैयक्तिक सराव देऊ शकते, शिक्षकांचा काही प्रमाणात ताण न्यून करू शकते; परंतु आजपर्यंत असे ठोस आणि दीर्घकालीन पुरावे उपलब्ध नाहीत की, कृत्रिम बुद्धीमता लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी शिक्षकांची जागा घेऊ शकते.

जागतिक संस्था ‘यु.एन्.इ.एस्.ओ.’ आणि ‘ओईसी’ यांनीही स्पष्ट चेतावणी दिली आहे, ‘तंत्रज्ञान हे शिक्षकांना पूरक असावे, पर्याय नाही.’ महाराष्ट्रासह भारतातील परिस्थिती पाहिली, तर अनेक शाळांमध्ये मूलभूत वाचन-लेखन कौशल्ये अजूनही प्रभावी नाहीत. ग्रामीण भागात ‘इंटरनेट’ आणि ‘डिजिटल साधने’ यांची असमान उपलब्धता आहे. अशा वेळी आपण तंत्रज्ञानावर अवलंबून राहून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहोत का ? लहान वयात मुलांना सर्वांत अधिक आवश्यकता असते ती, म्हणजे शिक्षकांचा जिव्हाळा, प्रत्यक्ष संवाद, प्रश्न विचारण्याची मोकळीक, भावनिक सुरक्षितता, खेळातून शिकण्याची संधी इत्यादींची. कृत्रिम बुद्धीमत्ता यांपैकी किती गोष्टी देऊ शकते ? तंत्रज्ञानाला शिक्षणाचा केंद्रबिंदू बनवणे धोकादायक ठरू शकते. शिक्षण ही केवळ कार्यक्षमतेची प्रक्रिया नाही; ती माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. पुढील पिढीला ‘स्क्रीन’समोर बसवून माहिती देणारे बनवणार आहोत कि विचार करणारे ? संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडवणार आहोत का, याचा विचार आवश्यक आहे. शिक्षणाच्या मुळात माणूस आहे, यंत्र नाही, हे आपण विसरून चालणार नाही !
– श्री. किशोर जगताप, सोलापूर
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !