१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

शिवसेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापण्यात येणार असून त्यांनी त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजप-शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन केले.

येत्या २ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता !

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे सदस्यत्व रहित व्हावे, यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन १-२ दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ! – सुनील मोदी, शिवसेना

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी आणि समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पत्रकर परिषदेत केला.

शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी !

शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांची शिंदे गटाकडून युवासेना राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

शरद पवार यांनी शिवसेना फोडली, हे उद्धव ठाकरे यांना कधी लक्षात येणार ? – शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेना फोडली आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या कधी लक्षात येणार ? शिवसेनेचे ५० आमदार पक्ष सोडून का गेले ? याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० जुलै या दिवशी सुनावणी होणार !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय पिठासमोर सुनावणी होईल. या निवाड्यावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुनावणीमुळे २० जुलैला होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवीन कार्यकारिणी घोषित !

शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदी अजूनपर्यंत कुणाचीही नियुक्ती केलेली नाही.

शिवसेनेचे कट्टर समर्थक रामदास कदम यांचे पक्ष नेतेपदाचे त्यागपत्र

शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचे त्यागपत्र दिले आहे. या पत्रात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना ‘तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली’, असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असे का वाटणार नाही ? – खासदार संजय राऊत, शिवसेना

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का ? हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी आहेत. इतकी वर्षे आम्ही काम केले आहे. ते एकत्र यावेत, असे का वाटणार नाही ?, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथे दिली आहे. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी आक्रमण केले होते.