वाहनांची वाढती संख्या, वाहनांची कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता !

काही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त मी पुण्याला गेलो. पुण्यात हडपसर भागात प्रवेश केल्यानंतर घरी कोथरूड येथे पोचायला मला जवळजवळ २ घंटे लागले. मी प्रवासात रस्त्याचे दोन्ही बाजूंचे निरीक्षण करत असतांना लक्षात आले की, रस्त्यावर दुतर्फा केवळ गाड्या न गाड्याच होत्या. या गाड्यांच्या गर्दीत रुग्णवाहिकेला वाट मिळणेही अत्यंत कठीण झाल्याचे मला दिसून आले. उड्डाणपुलावरून खाली पाहिल्यावर जेवढी गर्दी पुलावर होती, तितकीच खालीही होती. काही दुचाकी वाहनचालक अगदी पदपथावरून भरधाव वेगाने दुचाकी चालवत जात होते. हे सर्व पाहून मन विषण्ण झाले. ही केवळ एका शहराची समस्या नाही. भारतभरात सर्वच शहरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ही वाढ भयावह अशी आहे.

– योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.

१. नवीन वाहन खरेदी-विक्री व्यवसायात सणावारी होत असलेली प्रचंड उलाढाल !

प्रत्येक सणाला वाहन खरेदी विक्री व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक आस्थापन प्रतिवर्षी दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांमध्ये काहीतरी नाविन्य आणते आणि विविध विज्ञापनांच्या अन् आकर्षक सवलतींच्या माध्यमातून लोकांना खरेदीसाठी आकर्षित करते. वर्ष २०२४-२५ मध्येही दुचाकी आणि चारचाकी वाहन विक्रीमध्ये प्रत्येक आस्थापनाने उच्चांक गाठला आहे. प्रतिवर्षी जितक्या नवीन गाड्या रस्त्यावर येतात, तितक्या जुन्या गाड्या मोडीत निघतात का ? हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे सर्वच शहरांतील रस्ते गाड्यांनी तुडुंब भरलेले दिसतात. वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे रस्ते वाहतूक घंटोन्‌घंटे खोळंबलेली रहाते.

श्री. योगेश जलतारे

२. वाहन पार्किंग करायचे कुठे ?

वाढत्या वाहन संख्येमुळे बाजारात जातांना वाहन कुठे पार्क करायचे (वाहन कुठे उभे करायचे) ?, ही मोठी समस्या असते. कुठे तरी दूर वाहन पार्क करून बाजारहाट करायची आणि सामानाचे ओझे वहात परत स्वतःच्या वाहनाजवळ यायचे, यात किती तारांबळ उडते, याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. ही अडचण केवळ बाजारात येते असे नाही, कुणा परिचिताकडे जायचे म्हटले, तर तेथेही मर्यादित पार्किंग व्यवस्था असल्याने गाडी कुठे लावायची ? असा मोठा प्रश्न चालकासमोर असतोच असतो. वयस्कर नातेवाईक समवेत असल्यास त्यांना काही अंतर चालावेही लागते.

३. स्वतंत्र वाहनाची आवश्यकता का भासते ?

याचे उत्तर अत्यंत सोपे आहे, ते म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित आणि जनतेला अपेक्षित अशी नसल्याने स्वतःचे वाहन असल्यास आपल्याला दैनंदिन व्यवहार करायला सुलभता येते. हे जरी वास्तव असले, तरी अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध असूनही स्वतंत्र वाहनाचा पर्याय अवलंबला जातो. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडते. नोकरी करणारा माणूस सार्वजनिक व्यवस्था सुलभ नसल्याने वेळ अधिक लागतो, या कारणाने स्वतंत्र वाहनाने स्वतःच्या कार्यालयात जाण्याचा विचार करतो; परंतु वाहतुकीचा खोळंबा झाल्यास नेहमीपेक्षा अधिक वेळ वाया जातो, असा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. याखेरीज वाहतूक खोळंबल्यास होणारा मनस्ताप वेगळा असतो.

ही झाली गरजवंताची अडचण; परंतु अनेक लोक स्वतःचे ऐश्वर्य दाखवण्यासाठी एकापेक्षा अधिक वाहने विकत घेतात. काही घरांमध्ये माणशी एक दुचाकी वाहन असते, याखेरीज एक वा दोन चारचाकी गाड्याही दिमतीला असतात. असे कितीतरी घरांमध्ये दिसून येते. पूर्वी मुले कमवायला लागल्यावर गाडी विकत घ्यायचे, सध्या मुलाची १०-१२ वी झाल्यावरच पालकांना मुलांसाठी गाडी विकत घ्यावी लागते; कारण मुलांचे शिकवणी वर्ग अन् महाविद्यालय लांब असते आणि पालकांना त्यांना प्रतिदिन सोडणे-आणणे शक्य नसते.

तात्पर्य, गरजवंताला अडचण असल्याने तो वाहन घेतो, तर श्रीमंत त्याच्या ऐश्वर्याचा उपभोग घेण्यासाठी वाहन घेतो. एकूण काय, तर वाहनांची संख्या वाढतच रहाणार. या सर्व गर्दीमुळे आज रस्ते न्यून पडत आहेत. कित्येक शहरांमध्ये मोठे उड्डाणपूल बांधूनही वाहतुकीची समस्या न्यून झालेली नाही.

४. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करणे आवश्यक !

रस्त्यावर वाहनांची जी गर्दी होते, ती मुख्यत्वे करून शासकीय आणि खासगी आस्थापने यांच्या कार्यालयांच्या वेळांमध्ये होत असते. त्यामुळे शासकीय आणि खासगी आस्थापने यांनी त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी, जेणेकरून खासगी वाहनांची गर्दी त्या वेळेस तरी रस्त्यावर अल्प प्रमाणात होईल. शासनाला वाहन खरेदी विक्रीच्या माध्यमातून महसूल प्राप्त होतो, हे जरी खरे असले, तरी त्यापेक्षा दुप्पट व्यय वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी द्यावा लागत असेल, याखेरीज जनसामान्यांना येणार्‍या अडचणी वेगळ्याच ! त्यामुळे सरकारने या समस्येचा सर्वंकष अभ्यास करून सार्वजनिक व्यवस्था सुरळीत आणि चांगली करण्यावर भर द्यायला हवा. योग्य वेळेत वाहने उपलब्ध झाली आणि त्यांची गुणवत्ता चांगली असली, तर लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याकडे वळतील अन् खासगी वाहनांचा वापर निश्चितच न्यून होईल.

५. खासगी वाहनमालकांनी स्वतःवरच अंकुश ठेवणे महत्त्वाचे !

स्वतःच्या चैनीसाठी वाहने विकत घेणार्‍या लोकांवर सरकार प्रतिबंध घालू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांनी समाजहिताच्या दृष्टीने विचार करून वाहन विकत घेतांना ते खरेच आवश्यक आहे का ? किंवा घरी असलेल्या वाहनाच्या माध्यमातून स्वतःची नियमित आवश्यकता भागत असेल, तर निराळे नवीन वाहन घेण्याची आवश्यकता आहे का ? याचा अभ्यास करायला हवा. त्यातून त्यांचीही अप्रत्यक्ष समाजसेवा घडेल. असे केल्याने या समस्येवर काही प्रमाणात मात करता येऊ शकेल. याखेरीज खासगी आस्थापनांनी कामाच्या वेळेचे विभाजन करून रस्त्यावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हातभार लावायला हवा.

अर्थात् या सर्व तात्पुरत्या उपाययोजना आहेत. दिवसेंदिवस होत असलेली लोकसंख्यावाढ, हे खरे या समस्येचे मूळ कारण असून त्याविषयीही गांभीर्याने विचार व्हायला हवा. अन्य देशांतून भारतात होणार्‍या घुसखोरीवर आळा घालून सरकारने स्वतःच्या जनतेला आवश्यक त्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. (२१.१०.२०२५)

देशातील वाहनांची वाढती संख्या आणि त्यावरून निर्माण झालेल्या समस्या हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांच्या दूरदृष्टीच्या अभावाचे द्योतक !