गोमंतकीय तरुण वर्षभरापासून कंबोडिया देशात पडला अडकून विदेशात नोकरी देण्याचे आमीष दाखवून झालेली फसवणूक !

पणजी, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – विदेशात नोकरीच्या आमिषाला भुललेल्या फोंडा तालुक्यातील एका युवकाला कंबोडियाच्या प्रशासनाने बंदी बनवले आहे. हा युवक गेल्या वर्षभरापासून कंबोडिया येथे अडकून पडला आहे. युवकाच्या सुटकेसाठी राज्यशासनासह केंद्रशासनाचा भारतीय दूतावास प्रयत्न करत आहे; मात्र अद्याप या प्रयत्नांना यश आलेले नाही.

गोव्यातील अनिवासी भारतीय आयुक्तालयातील सहसंचालक अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिला दलालाने ‘थायलंड येथे चांगल्या वेतनाची नोकरी देतो’, असे सांगून संबंधित तरुणाला प्रारंभी थायलंड येथे नेले. तेथून त्या युवकाला मोटरसायकलवरून अनधिकृतपणे कंबोडिया येथे पाठवण्यात आले. संबंधित तरुणाकडे कंबोडिया देशाचे पारपत्र (व्हिसा) नसल्याने त्याला कंबोडिया प्रशासनाने कह्यात घेऊन तेथील ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये पाठवले. सध्या संबंधित तरुणाकडे कंबोडिया प्रशासनाकडे भरण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे संबंधित युवक
सध्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मार्फत पुरवल्या जाणार्‍या अन्नावर जगत आहे. युवकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसला, तरी कंबोडिया प्रशासनाने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे तो गेल्या वर्षभरापासून तेथे अडकून आहे. युवकाची आई मुलाला सोडवून आणण्यासाठी अनिवासी भारतीय कार्यालयात फेर्‍या मारत आहे.

युवकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच नोकरीच्या निमित्ताने विदेशात जावे ! – नरेंद्र सावईकर, अनिवासी भारतीय आयुक्त

नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाऊ इच्छिणार्‍या गोमंतकीय नागरिकांनी अनिवासी भारतीय कार्यालयाचे साहाय्य घेऊन आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मगच विदेशात नोकरीसाठी जावे. नागरिकांनी फसव्या दलालांचा आधार घेऊन विदेशात नोकरीसाठी गेल्यास वाईट अनुभव येण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अशा लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन अनिवासी भारतीय आयुक्त अधिवक्ता नरेंद्र सावईकर यांनी केले आहे.