टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सिद्ध !

मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग, तसेच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २ लाख ६७ सहस्र २५० टपाली मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना टपाली मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे.

टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावू इच्छिणार्‍या मतदान कर्मचार्‍यांनी प्रपत्र-१२ मध्ये आपला मतदान करण्यासाठी असलेला अर्ज संबंधित समन्वय अधिकार्‍याच्या द्वारे निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे मतदानाच्या दिनांकाच्या आधी किमान ७ दिवसांपर्यंत सादर करावा, असा नियम आहे.

प्रत्येकाचे मत मोलाचे आहे, हे लक्षात घेऊन राज्याची निवडणूक यंत्रणा कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी ही कार्यवाही करत आहे.