प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान !

कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवर

मुंबई – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते १ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी श्री. टी. शिवलिंगम यांना ‘श्री षण्मुखानंद नादस्वरम् चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, सुवर्ण लेपित कांस्याचा दिवा, नादस्वरम् आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभा यांच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, उपाध्यक्ष डॉ. व्ही. रंगराज, शेषमपट्टी श्री. टी. शिवलिंगम आणि श्रीराम फायनान्सचे उपाध्यक्ष उमेश रेवणकर उपस्थित होते.

देशातील ५० युवा नादस्वरम् कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान !

देशातील ५० युवा नादस्वरम् कलाकारांना या वेळी राज्यपालांच्या हस्ते प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभा यांच्या वतीने पुढील ३ वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.