‘१७.७.२०२४ या दिवशी मला परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत, वय ८२ वर्षे) यांना देण्यासाठी प्रसाद दिला होता. तो प्रसाद घेऊन मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा माझे त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे दिले आहे.
१. पू. (श्रीमती) निर्मला दाते (सौ. ज्योती दाते यांच्या सासूबाई) यांचे त्यांची विहीण पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (सौ. ज्योती दाते यांची आई) यांनी केलेले कौतुक
श्री. महेश पाठक : सौ. ज्योती दातेकाकू (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) पू. दातेआजींची सेवा चांगली करतात. (मागील काही दिवसांपासून पू. दातेआजी रुग्णाईत आहेत.)
पू. कुलकर्णीआजी : हो. ज्योती पू. दातेआजींची चांगली सेवा करते. ‘एक मुलगीसुद्धा तिच्या आईची एवढी सेवा करणार नाही’, अशा पद्धतीने सौ. ज्योती पू. दातेआजींची सेवा करत आहे. त्या दोघींचे नातेच वेगळे आहे. विवाहानंतर लगेच सौ. ज्योतीला ‘एम्.एस्.सी.’ची परीक्षा द्यायची होती. त्या वेळी ती गरोदरही होती. तेव्हा पू. दातेआजींनी तिची संपूर्ण काळजी घेतली. दाते कुटुंबियांचे सदाशिव पेठेतील घर लहान होते. त्यामुळे पू. दातेआजी यांनी तिच्या अभ्यासात अडचण येऊ नये; म्हणून त्यांच्या ओळखीतील एका कुटुंबाच्या घरी तिची अभ्यास करण्याची सोय केली. त्या ज्योतीला म्हणायच्या, ‘‘तू घरातील कामाचा विचार करू नकोस.’’ त्या तिला अधिकाधिक साहाय्य करायच्या. त्यानंतर तिला अधिकोषात नोकरी मिळवण्यासाठी एक परीक्षा द्यायची होती. त्या वेळीही पू. दातेआजींनी सौ. ज्योतीला घराचे दायित्व सांभाळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. पू. दातेआजी ज्योतीला साधनेतही पुष्कळ साहाय्य करायच्या.
२. पू. दातेआजी यांच्या संदर्भातील हे सर्व पू. कुलकर्णीआजी मला सांगत असतांना त्यांची आणि माझीही पुष्कळ भावजागृती झाली.
सर्वसाधारणपणे समाजात सासू आणि सुना यांच्यात काही वेळा मतभेद असल्याचे आढळते; मात्र साधना करणार्या सासू (पू. निर्मला दातेआजी) आणि सून (सौ. ज्योती दाते) यांचे आध्यात्मिक स्तरावरील प्रेमाचे नाते मी प्रथमच अनुभवले.’
– श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे), पुणे (१७.४.२०२४)