- शिवीगाळ आणि एकमेकांविरुद्ध हातवारे केले
- विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !
मुंबई, १ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत काढलेल्या अपशब्दाचे पडसाद १ जुलै या दिवशी विधान परिषदेमध्येही उमटले. या वेळी सभागृहात निषेधाचा ठराव घेण्याची मागणी भाजपच्या वतीने आमदार प्रसाद लाड यांनी केली; मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘सभागृहाशी संबंध नसलेल्या विषयावर बोलू नये’, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. आरोप-प्रत्यारोप अन् शिवीगाळ करत ते एकमेकांविरुद्ध हातवारे करत होते. त्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले.
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यागपत्र देऊन सर्वांची क्षमा मागावी. ‘राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव उपसभापतींनी स्वतःहून मांडावा आणि सभागृहाने निषेधाचा एकमताने ठराव करावा अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही’, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांनी मांडली. या वेळी ‘विरोधी पक्षनेत्यांनी अपशब्द वापरले’, असा आरोप करत सत्ताधारी आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम ५ मिनिटे, नंतर १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
कामकाज चालू होताच दानवे यांनी पुन्हा प्रसाद लाड यांच्याकडे बघून अपशब्द वापरले. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज स्थगित झाले. अंबादास दानवे म्हणाले की, प्रसाद लाड यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वासाठी माझ्या अंगावर ७५ खटले आहेत. मी धर्मासाठी तडीपारीही सहन केली आहे. आमचे हिंदुत्व बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्व आहे. मी क्षमा मागणार नाही.