संपादकीय : ही शिक्षा पुरेशी आहे ?

‘आ यआयटी बाँबे’मध्ये झालेल्या एका नाटकात हिंदूंच्या देवतांच्या करण्यात आलेल्या अश्लाघ्य विडंबनाच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेने दंडाची शिक्षा ठोठावली. काही मासांपूर्वी, म्हणजे ३१ मार्च २०२४ या दिवशी ‘आयआयटी बाँबे’मध्ये घडलेला हा प्रकार आज बहुतांश लोक विसरलेही असतील. यानिमित्ताने पुन्हा एकदा त्याचे स्मरण करून देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे झालेला गुन्हा आणि दिलेली शिक्षा यांची तुलना जनतेलाच करता येऊ शकेल. ‘आयआयटी बाँबे’मध्ये ३१ मार्च २०२४ या दिवशी झालेल्या वार्षिक ‘कला महोत्सव’ अर्थात् ‘परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हल’मध्ये काही विद्यार्थ्यांनी ‘आरोहन’ नावाचे नाटक सादर केले होते. या नाटकात प्रभु श्रीरामाची खिल्ली उडवण्यात आली, तसेच संपूर्ण रामायण हे अश्लील आणि अपमानास्पद पद्धतीने दाखवले. या नाटकात श्रीरामाचे नाव ‘राया’, सीतेचे नाव ‘भूमी’, तर रावणाचे नाव ‘अघोरा’, असे ठेवण्यात आले होते. या नाटकात ‘राम आणि सीता एकमेकांवर आक्रमण करत आहेत, रावणाने केलेल्या अपहरणामुळे सीता लंकेत आनंदी असून त्याची स्तुती करत आहे, लक्ष्मण आणि सीता एकमेकांशी अश्लील संवाद साधत आहेत’, असे अत्यंत बीभत्स चित्रण दाखवण्यात आले होते. यावर बराच गदारोळ होऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यामुळे ‘आयआयटी बाँबे’ प्रशासनाने याची नोंद घेऊन चौकशी समिती नेमली. तिचा अहवाल येऊन आता दोषी विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख २० सहस्र रुपयांचा, तर कनिष्ठ इयत्तेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आज-काल हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवणे, ही ‘फॅशन’ झाली आहे. यातून स्वस्तात भरपूर प्रसिद्धी मिळते. अशात ‘आयआयटी बाँबे’ने हिंदूंच्या तक्रारींची नोंद घेऊन दोषींना अडीच मासांनी का होईना; पण शिक्षा दिली, हेही नसे थोडके.

शिक्षा ही नेहमी गुन्ह्याच्या स्वरूपात निश्चित केली जाते. ‘जेवढी गुन्ह्याची तीव्रता अधिक, तेवढी शिक्षा अधिक’, असे सर्वसाधारण धोरण असते. ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना झालेल्या शिक्षेचे अवलोकन केल्यास प्रशासनाच्या दृष्टीने ‘तो फार मोठा गुन्हा नाही’, असेच दिसून येते. ‘आरोहन’ नाटकात प्रभु श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि रावण यांचे ज्या पद्धतीने विडंबन केले गेले, ते पहाता याची शिक्षा केवळ दंडाच्या स्वरूपात दिली जाऊ शकत नाही. कलाविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली या विद्यार्थ्यांनी १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना जाणूनबुजून पायदळी तुडवल्या आहेत. त्यामुळे खरे तर त्यांना ‘आयआयटी’तून बडतर्फच करायला हवे होते. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकायला हवे होते; पण असे झाल्याचे ऐकिवात नाही. झालेली शिक्षा त्यांना भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे करण्यापासून परावृत्त करील का ?, हा खरा प्रश्न आहे. या संस्थेतील विद्यार्थी उद्या जेव्हा देशातील विविध महत्त्वाच्या सरकारी पदांवर अधिकारी म्हणून बसतील, तेव्हा त्यांच्या विभागांत देवतांचे असे विडंबन झाल्यास ते त्याची कितपत नोंद घेतील, हाही प्रश्नच आहे; किंबहुना त्याला ते पाठिंबाच देण्याची शक्यता अधिक आहे.

‘आयआयटी’तील ही घटना घडण्याच्या साधारण १ मास अगोदर, म्हणजे २ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातही अगदी असाच प्रकार घडला होता. येथे ‘ललित कला केंद्रा’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘रामलीला’ कार्यक्रमात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे संवाद आणि दृश्ये दाखवण्यात आली होती. यावर मोठा गदारोळ झाल्यानंतर १ प्राध्यापक आणि ५ विद्यार्थी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. यासह या विद्यापिठाने चौकशी समिती स्थापन केली. तिचा अहवाल एप्रिल २०२४ मध्ये सादर करण्यात आला. ‘आयआयटी’ आणि पुणे विद्यापीठ या दोन्ही ठिकाणच्या घटनांची तुलना केल्यास लक्षात येईल की, दोन्ही घटना शिक्षण संस्थांमध्येच घडल्या, दोन्ही प्रकरणांमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबनच केले गेले, ते करणारे विद्यार्थीच होते, मग तरीही एका प्रकरणात गुन्हा नोंद होऊन दोषींना कारागृहात टाकले जाते, तर दुसर्‍या प्रकरणात केवळ अंतर्गत चौकशी करून आणि दोषींना केवळ दंडात्मक शिक्षा करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. हे कसे ? या गुन्ह्यातील सर्वच विद्यार्थी सुजाण आहेत. आपण करत असलेली कृती योग्य आहे कि अयोग्य ?, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तरीही ते १०० कोटी हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवतात, म्हणजेच ते जाणूनबुजून हे कृत्य करतात, हे उघड आहे. त्या तुलनेत त्यांच्यावर ठाेस कारवाई होत नाही, ही वस्तूस्थिती आहे आणि ती हिंदूंना अत्यंत लज्जास्पद आहे. देशातील कुठल्या विद्यापिठातच काय; पण कुठल्याही मंचावर अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन कुणी करू धजावत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

कारणांचा शोध घ्या !

देवतांचे विडंबन करण्याच्या घटना केवळ ‘आयआयटी बाँबे’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातच घडल्या आहेत, असे नाही. देहलीतील कुप्रसिद्ध असलेल्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापिठा’त अर्थात् ‘जे.एन्.यू.’त नेहमी घडत असतात. तेथे ती ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘तुम कितने अफझल मारोगे ?, घर घर से अफझल निकलेगा’, अशा प्रकारच्या राष्ट्रविरोधी घोषणाही सर्रास दिल्या जातात. या विद्यापिठातील कारवाया आणि शहरी नक्षलवाद्यांच्या कारवाया, यांत कमालीचे साम्य असणे, हा योगायोग नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करून हिंदूंना डिवचण्याचे वाढते प्रकार पहाता पोलिसांनी या घटनांच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. अशी कृत्ये विद्यार्थीच करतात कि त्यांच्याकडून कुणी करवून घेते ?, असे कार्यक्रम करायला विद्यार्थ्यांना कोण पैसा पुरवतो ?, शिक्षणसंस्थांमध्ये अशा नाटकांना कोण अनुमती देतो ?, मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये हिंदुविरोधी घटना घडवून आणण्यामागे कुठली ‘इकोसिस्टीम’ कार्यरत आहे का ?, त्यामागे शहरी नक्षलवाद्यांचा हात आहे का ? आदींचे अन्वेषण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. असे न करता ठोठावलेली शिक्षा वरवरचीच म्हणावी लागेल.

विद्याशाखेची परवड रोखा !

विद्यापिठे ही ज्ञानार्जनाची केंद्रे असली पाहिजेत. तेथे शुद्ध ज्ञानाचे अध्ययन-अध्यापन होणे अपेक्षित आहे. सध्या हे सोडून तेथे सर्व नको त्या गोष्टी उघडपणे चालू असतात. शिक्षणक्षेत्रात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. आता विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत सकारात्मक पालट होण्याविषयीचे नवे धोरण आखण्याचीही आवश्यकता आहे, तरच विद्याशाखेची परवड रोखली जाऊ शकेल !