Devendra Fadnavis : मला उपमुख्यमंत्रीपदाच्या दायित्वातून मुक्त करा ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी भाजपच्या राज्यातील पराभवाचे दायित्व स्वीकारले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस संवाद साधताना

मुंबई – भाजपच्या राज्यातील पराभवाचे दायित्व स्वीकारत देवेंद्र फडवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याची सिद्धता दर्शवली आहे. ‘आता मला विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण सिद्धता करायची आहे. त्यामुळे मला उपमुख्यमंत्रीपदाच्या दायित्वातून मोकळे करावे’, अशी मागणी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले. पराभवाचे सर्व दायित्व माझे आहे आणि मी ते स्वीकारतो. महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला अपेक्षापेक्षा पुष्कळ अल्प जागा मिळाल्या. जनतेने दिलेला जनादेश मानून आम्ही पुढील सिद्धता करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचे अभिनंदन करतो.’’

राज्यघटना पालटणार, या विरोधकांच्या अपप्रचाराचा फटका आम्हाला बसला !  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ५ जून (वार्ता.) – निवडणुकीत आमच्याविषयी ‘भाजपला बहुमत मिळाल्यास राज्यघटना पालटणार’, असा अपप्रचार करण्यात आला. या अपप्रचाराला आम्ही परिणामकारकपणे उत्तर देऊ शकलो नाही. अन्य कारणांप्रमाणे याचाही फटका आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीसह अपप्रचाराच्या विरोधातही आम्हाला लढा द्यावा लागला. राज्यघटना पालटणार, हा अपप्रचार ज्या प्रमाणात थांबवायला हवा होता, तो आम्हाला थांबवता आला नाही. त्यामुळे आम्ही हरलो. ज्या मतदारसंघात २-३ वेळा निवडून आलेले उमेदवार सतर्क राहिले नाहीत, हे निवडणुकीच्या वेळी आमच्या लक्षात आले. कांद्याच्या प्रश्‍नाचाही आम्हाला फटका बसला. कापूस आणि सोयाबीन यांची हानीभरपाई आम्ही घोषित केली; मात्र आचारसंहितेपूर्वी आम्ही पैसे देऊ शकलो नाही. याचाही परिणाम मतांवर झाला. मराठा आरक्षण देऊनही आम्ही या विरोधातील अपप्रचाराला परिणामकारक उत्तर देऊ शकलो नाही. विशेषत: मराठवाड्यात आम्हाला याचा फटका बसला. आम्हाला मिळालेल्या अपयशाचे दायित्व मी स्वीकारत आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांसमवेत समन्वयाचा अभाव राहिल्याचे आढळून आले. याविषयी आम्ही एकत्र बैठक घेणार आहोत. जनतेचा कौल शिरसावंद्य मानून आम्ही पुढच्या निवडणुकीची सिद्धता करणार आहोत. पुढच्या निवडणुकीसाठी नवीन रणनीती सिद्ध करून आम्ही पुन्हा जनतेची भेट घेऊ.’’

मुंबईत भाजपला अल्पसंख्यांकांची मते मिळाली नाहीत ! – फडणवीस

मुंबईतील मतदान वेगळ्या दिशेने झाले. मुंबईमध्ये आम्हाला अल्पसंख्यांकांची मते मिळाली नाहीत, असे वक्तव्य या वेळी फडणवीस यांनी केले.