पणजी, १८ मे (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेटमधील संशयित न्यूटन मुथरी किमानी या केनिया राष्ट्रातील नागरिकाने हवालाच्या माध्यमातून विदेशात २१ कोटी रुपये पाठवल्याचे उघडकीस आले आहे. शिवोली येथे चालू असलेले हे आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेट अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) गतवर्षी उघडकीस आणले होते.
न्यूटन हा वर्ष २०१८ मध्ये विद्यार्थी व्हिसावर औषधालय (फार्मसी) अभ्यासक्रमात पदवी घेण्यासाठी भारतात आला होता. अंमलबजावणी संचालनालयाने गतवर्षी सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेटमधील मुख्य सूत्रधार डॉरकास्ट मारिया या केनिया देशाच्या नागरिकाला कह्यात घेतले होते आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये न्यूटन याला कह्यात घेतले होते. पैशांचा अपव्यवहार केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. संशयित न्यूटन हा सध्या कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेटच्या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात केनिया राष्ट्रातील ३ नागरिक, तर टांझानिया देशातील एक नागरिक यांनी पैशांचे अपव्यवहार केल्याचे म्हटले आहे. मुख्य सूत्रधार डॉरकास्ट मारिया हा केनिया येथून युवतींना हॉटेल व्यवसायात नोकरी देण्याचे आमीष दाखवून गोव्यात आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत होता. आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये वर्ष २०१९ पासून संशयित न्यूटन यांनीही सहभाग घेतला. संशयित न्यूटन आणि या प्रकरणातील अन्य एक आरोपी वेश्याव्यवसायातून मिळत असलेले पैसे केनिया येथील एका तिसर्या व्यक्तीच्या अधिकोषात पाठवत होता. संशयित न्यूटन याचे गोवा, बेंगळुरू आणि पंजाब येथे ४ अधिकोषांमध्ये, तर या प्रकरणातील अन्य एक महिला आरोपी हेलन हिने ५ अधिकोषांमध्ये खाते उघडले होते. या सर्व अधिकोषांचा व्यवहार संशयित न्यूटन याच्या मार्गदर्शनाखाली चालत होता.
संपादकीय भूमिकाविदेशी नागरिकांकडून चालत असलेले आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेटचा गोवा प्रशासनाला ५ वर्षे थांगपत्ता न लागणे लज्जास्पद ! |