मनोज जरांगे यांचे ४ जूनपासून पुन्हा ‘बेमुदत उपोषण’ चालू होणार !
छत्रपती संभाजीनगर – ‘राज्य सरकारने १० टक्के दिलेले आरक्षण फसवे निघाले. याचा मराठा समाजाला लाभ झाला नसल्याने ४ जून या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे ‘बेमुदत उपोषणा’ला बसणार आहे. ८ जून या दिवशी नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार आहे. या सभेची पहाणी करण्यासाठी १५ मे या दिवशी ते नारायणगडावर जाणार आहेत, तसेच ओबीसीतून आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ जागा लढवण्यात येतील’, अशी समयमर्यादा मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिली आहे.
बुलंद छावा मराठा युवा परिषद प्रणीत छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या एन्-११ ते टीव्ही सेंटर चौक अशा मिरवणुकीच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या माता-भगिनींचे डोके फोडले. तरुणांवर गुन्हे नोंद केले. महिलांना तडीपार केले. फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा, असे आवाहन त्यांनी केले.