तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बनावट कागदपत्रे दिल्यास गुन्हे नोंद होणार !

पुणे – तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिल्या. विद्यार्थ्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांचा प्रवेश रहित करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रिकी, वास्तूकला, हॉटेल मॅनेजमेंट, औषध निर्माण शास्त्र, बीबीए, बी.एम्.एस्., बीसीए, एम्.बी.ए., एम्.सी.ए., एम्.टेक अशा विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. आवश्यक कागदपत्रांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्राधिकृत केलेले जात जमात प्रमाणपत्र, जात जमात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग प्रमाणपत्र, दिव्यांगांच्या संदर्भातील प्रमाणपत्र, आधार क्रमांक, नोकरदारांसाठी अनुभव प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र अशा कागदपत्रांचा समावेश आहे. अधिक माहिती https://dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिली आहे.