‘शेअर मार्केट’मधील लाभाचे आमीष दाखवून चिखली (पुणे) येथे पिता-पुत्रांकडून ४० जणांची फसवणूक !

पुणे – ‘शेअर मार्केट’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘डी मॅट’ खाते काढले असल्याचे सांगत सीताराम खाडे आणि प्रशांत खाडे या पिता-पुत्रांनी ४० जणांची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात ‘डी मॅट’ खाते सिद्ध न करता, त्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन १ कोटी १२ लाख २८ सहस्र रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार चिखली येथील पूर्णानगरमध्ये वर्ष २०१५ ते ५ मे २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे. या प्रकारणी सुहास शेजवळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (फसवणूक करणार्‍यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)  आरोपी पिता-पुत्रांनी संगनमत करून तक्रारदार शेजवळ आणि त्यांचे सहकारी यांना ‘शेअर मार्केट’मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून सर्वांकडून वरील रक्कम रोख आणि धनादेशाद्वारे घेतली. प्रारंभी काही दिवसांनी परतावा दिला. त्यानंतर मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी परतावा देणे बंद केले.