पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. पाटकर यांना संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप !

मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. स्वप्ना पाटकर यांनी ठाकरे गटाचे संजय राऊत हे त्यांना धमकी देत असल्याविषयी आणि हेर ठेवून त्रास देत असल्याविषयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पत्राचाळ प्रकरणात १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळा करून पैशांची अफरातफर (मनी लाँड्रिंग) केल्या प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांची चौकशी करत आहे.

त्यांनी पत्रात लिहिले आहे की, यापूर्वीही माझ्यावर, गाडीवर आक्रमण झाले आहे. ३ मे या दिवशी बीकेसी येथे माझा पाठलाग करण्यात आला. संजय राऊत मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेत. याविषयी तक्रार करूनही पुढे काही झाले नाही. एका हेरालाही अटक करण्यात आली होती; परंतु त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. मला धमकी देऊन माझ्याशी गैरवर्तन करण्यात आले; परंतु काही कारवाई झाली नाही. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले नाही. मला दुबई आणि पाकिस्तान येथून धमकीचे दूरभाष आले, घरावर दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या.

काय आहे पत्राचाळ प्रकरण ?

गोरेगाव सिद्धार्थनगर येथे ४७ एकरमध्ये ६७२ घरे झाली आहेत. वर्ष २००८ मध्ये हा प्रकल्प चालू झाले. एवढी वर्षे होऊनही लोकांना घरे मिळालेली नाहीत. या प्रकरणी राऊत यांना जामीन मिळाला आहे.