नगर – जीवन अथांग महासागरासारखे आहे. आपण जीवनात कुणालाही दुःख न देता, कुणालाही न दुखावता आनंद देत जगलो, तर जीवनाला आनंदाने अच्छा-अच्छा म्हणता येते. जीवनाला आनंदाने अच्छा म्हणण्यातच मौज असून ती समजली पाहिजे, असे वेदांताचे गाढे अभ्यासक आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले यांनी सांगितले.
श्रीमद् आद्यशंकराचार्य जयंतीनिमित्त येथील ‘ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळा’च्या वतीने रासनेनगरमधील श्री दुर्गामाता मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या प्रवचनमालेचा समारोप करतांना ते बोलत होते.
सौ. शैलजाताई लुले, सौ. अश्विनी धर्माधिकारी, सौ. शशिकला क्षीरसागर आणि सौ. विरश्री देवकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळाच्या वतीने आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले यांना गौरवले. इंजि. एन्.डी. कुलकर्णी यांनीही डॉ. लुले यांना महावस्त्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त करतांना श्री. अशोककाका भोंग आणि मी अशी दोघांमध्ये ग्रंथराज दासबोधवर चर्चा होत असे. या चर्चेचे रूपांतर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळात होऊन विनाखंड दासबोध वाचन-निरूपण चालू राहिले. येणार्या अक्षय्य तृतीयेस ५ वर्षे पूर्ण होतील, अशी माहिती दिली. सौ. अर्चना कुलकर्णी यांनी सुमधूर आवाजात गुरुपद गायिले. श्री. सुरेंद्र देव यांनी स्वरचित गुरुनमन म्हटले. श्री. संभाजीराव देवकर (धुळे) यांनी श्रोत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. श्री. सर्वोत्तम क्षीरसागर यांनी आभार मानले.
आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले पुढे म्हणाले,
१. आपण देहाला बघावे की, आत्म्याला बघावे हे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. निमित्त अर्जुन असला, तरी अर्जुनाच्या जागेवर आपण आहोत, असा विचार केल्यास ‘भगवंत आपल्यालाच मार्गदर्शन करीत आहे’, असे जाणवते.
२. आजच्या काळात हे मार्गदर्शन तंतोतंत उपयुक्त ठरते, हीच भगवंताची लीला आहे. भगवंताच्या सांगण्यावरून अर्जुनाने युद्ध करत आप्तजनांनाही मारले; कारण आत्मा अमर आहे. अव्दितीय आहे. अव्यक्त आहे. आत्म्याचे चिंतन नाम, रूप, गुण, क्रिया, संज्ञा आणि संबंध या आधारे करतांना वाणी खुंटते.
३. उपनिषद पचवायला नेहमी कठीण जाते. गुरुकृपेविना अभ्यास होत नाही. परमार्थ दुसर्याला सांगण्याची गोष्ट नाही, तर अनुभवण्याची आहे.
४. शरिराला झालेली जखम काही काळाने भरून निघते; मात्र अंतःकरणाला झालेली जखम भरून निघत नाही. त्यासाठी कुणाचेही अंतःकरण दुखवू नये. आपल्याकडून कुणाच्याही अंतःकरणाला जखम होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक कर्म आनंददायी होण्यासाठीच करावे.
५. गृहिणींनी स्वयंपाक करतांना हे भगवंताला आवडेल का ? याचा विचार करावा. आनंदाने भगवंताचे नामस्मरण करत सात्त्विक स्वयंपाक करून श्रद्धेने भगवंतास नैवेद्य दाखवावा. घरातील सर्वांना एकत्र बसवून भगवंताचा प्रसाद या भावनेने भोजनाचा आनंद घ्यावा.
६. आनंदी रहाण्यातून आपण शोकाला सहजपणे बाजूला सारू शकतो. शोकमुक्त होवू शकतो. आपल्या सर्वांचे जीवन आनंदरूप व्हावे, असा आशीर्वाद देत आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले यांनी प्रवचन सोहळ्याची सांगता केली.