Hooghly Bomb Blast : हुगळी (बंगाल) येथे झालेल्या स्फोटात १ मुलगा ठार, २ मुले घायाळ !

हाकेच्या अंतरावर होणार होती तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची प्रचार सभा !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोलकाता (बंगाल) – राज्यातील हुगळी जिल्ह्यात असलेल्या पांडुआ भागात ६ मेच्या सकाळी बाँबस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामध्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. घायाळांपैकी एकाचा उजवा हात निकामी झाल्याचीही माहिती आहे. लहान मुलांना एका ठिकाणी बाँब दिसला. तो चेंडू समजून ते त्याच्याशी खेळू लागले असता त्याचा स्फोट झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची याच भागात हाकेच्या अंतरावर प्रचारसभा असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांकडून समजते. घायाळांचे नाव रूपम वल्लभ आणि सौरभ चौधरी असून त्यांचे वय ११ ते १३ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६ मेच्या सकाळी ८.३० वाजता पांडुआच्या तिन्ना भागातील तलावातून स्थानिक रहिवाशांना अचानक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यानंतर लोकांनी तलावाच्या काठी धाव घेतली असता त्यांना ३ मुले गंभीर घायाळ झाल्याचे दिसले. बाँब तिथे कसा आला आणि कुणी ठेवला ? याविषयी स्थानिकांना कोणतीच माहिती नाही. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये बाँब हे फटाक्यांसारखे फुटतात. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशा घटना घडणे भारतीय लोकशाहीची हत्या असून यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्यास तिच्यावर आता बंदीच घातली पाहिजे !