मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी २५ मार्च या दिवशी सांगली येथील कवठे महाकाळ येथील अमली पदार्थ सिद्ध करणार्‍या कारखान्यावर धाड टाकून तब्बल २५२ कोटी २८ लाख रुपयांचे अमली पदार्थ पकडले. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पकडलेल्या अमली पदार्थविरोधी कारवाईतील ही एक मोठी कारवाई आहे. मुंबई पोलिसांनी १६ फेब्रुवारी या दिवशी मुंबईतील चेंबूर येथे टाकलेल्या एका धाडीत काही अमली पदार्थ तस्करांना कह्यात घेतले होते. या तस्करांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. या कारवाईमध्ये अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त करून पोलिसांनी ‘मॅफेडोन’ नावाचा अमली पदार्थ कह्यात घेतला. यासह १५ लाख ८८ सहस्र रुपये रोख रक्कम आणि २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी घटनास्थळाहून कह्यात घेतले. दागिन्यांचे मूल्य १ लाख ५० सहस्र ४२० रुपये इतके आहे. एक पांढर्‍या रंगाची स्कोडा मोटारही पोलिसांनी कह्यात घेतली आहे. पकडण्यात आलेले आरोपी गुजरात राज्यासह महाराष्ट्रातील मुंबई, मीरारोड, सांगली आणि कोल्हापूर येथील आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ७ च्या पोलिसांनी ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

  • ‘उडता महाराष्ट्र’ झाल्यावर जागे झालेले पोलीस ! पोलिसांनी अशीच कारवाई पूर्वीपासून केली असती, तर अमली पदार्थांची समस्या केव्हाच संपली असती !